जालना, 14 मे: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा समाजातील विविध घटकांवर अत्यंत वाईट परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, तर अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले आहेत. अशातचं कोरोनाची भीती आणि मृत्यूची धास्ती अशा बिकट परिस्थितीमुळे अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. अशी एकंदरित परिस्थिती असताना जालन्यातील ब्लॅकबेल्ट तायक्वांदो खेळाडू आणि प्रशिक्षक (black belt winner Taekwondo coach) अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लॉकडाऊनच्या काळात अकॅडेमी बंद पडल्यानं आर्थिक संकटात सापडलेल्या तायक्वांदो खेळाडू आणि प्रशिक्षकानं प्लबिंगचा (Plumbing) व्यवसाय सुरू केला आहे.
प्रतीक ढाकणे असं या तरुणाचं नाव असून त्यानं आतापर्यंत अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तायक्वांदो स्पर्धांमध्ये जालन्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. एवढंच नव्हं तर ढाकणे तायक्वांदो अकॅडमीच्या माध्यमातून अनेक लहान मुलांना आणि तरुणांना त्यांनी तायक्वांदोचं प्रशिक्षण दिलं आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मात्र लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प झालं, परिणामी कुटुंबीयांचं पोट भरण्यासाठी प्लम्बर होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहेय
देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus Pandemic) शिरकाव होण्यापूर्वी त्यांचं सर्वकाही ठिक चालू होतं. दरम्यानच्या काळात त्यांनी लग्नही केलं. लग्न झाल्यानंतर मात्र काही दिवसांतचं देशात कोरोनानं शिरकाव केला. त्यामुळे देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. परिणामी सर्व शाळा, महाविद्यालयांसह सर्व क्लासेस बंद ठेवण्याचे आदेशही निघाले. प्रतीकच्या तायक्वांदो अकॅडमीला देखील या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. घरातील परिस्थिती हलाखीची आणि त्यातही दीड वर्षांपासून अकॅडमी बंद, त्यामुळे उत्पन्न बंद पडून घरात पैशाची चणचण भासू लागली. अशात घराची सर्व जबाबदारी एकट्या वडिलांवर येऊन ठेपली.
हे वाचा- बेरोजगार अभिनेत्याचा दुदैवी अंत; रिक्षात सापडला मृतदेह
लॉकडाऊनमुळे इच्छा आणि गरज असूनही एखादी नोकरी किंवा व्यावसाय करणं शक्य नव्हतं. पण त्यानं हार न मानता आपला वडिलांना प्लम्बिंगच्या कामात मदत करण्याचं ठरवलं. लहानपणापासून वडिलांना कामाच्या ठिकाणी डब्बा द्यायला गेल्यावर वडिलांचं पाहून पाहून थोडाफार प्लबिंगचं काम तोही शिकला होता. त्यानंतर आता काही दिवस वडिलांसोबत जाऊन त्यानं प्लांबिंगचं पूर्ण काम शिकून घेतलं आणि आता स्वतःचा प्लांबिंगचा व्यावसाय सुरू केला आहे. लॉकडाऊनमुळे प्रतीक प्लबिंगच्या कामात गुंतला असला तरी तायक्वांदो खेळाकडे त्यानं अजिबात दुर्लक्ष केलं नाही. तो आजही कामातून वेळ काढून आवर्जून तायक्वांदोचा सराव करत असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad News, Coach, Lockdown, Maharashtra, Unemployment