सचिन सोळुंखे, प्रतिनिधी
लातूर, 26 मे : उतार वयात दोघेही एकमेकांना आधार असतात. पण जर एकाने साथ सोडली तर दुसऱ्याचं काय होणार? अशीच मन हेलावून टाकणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. सकाळी पत्नीचे निधन झाल्याचे कळताच पतीनेही त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास प्राण सोडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना लातूर जिल्ह्यातील होळी (ता. औसा) येथे बुधवारी घडली. औसा तालुक्यातील होळी येथील रहिवासी सरस्वती सदाशिव जाधव (वय 95) यांचे बुधवारी दुपारी 2.47 वाजता निधन झाले. पत्नीच्या निधनाची बातमी समजताच पती सदाशिव शामराव जाधव (107) यांनाही धक्का बसला. एकीकडे घरात पत्नीच्या निधनामुळे शोकाकुल वातावरण पसरले होते. गावातून नातेवाईक घरी येत होते. पण अडीच तासांनी पत्नीच्या निधनाच्या दुःखातच बुधवारी सायंकाळी 5:15 वाजता सदाशिव जाधव यांनीही आपले प्राण सोडले.
(Wardha News: पतीचं निधन झालं, झुणका-भाकरीनं सावरलं, यशोदाबाईंचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष, Video)
एकाच दिवशी अडीच तासांच्या आत पत्नीपाठोपाठ पतीनेही आपले प्राण सोडल्यामुळे घरावर दुखाचा डोंगर कोसळला. वयाच्या अखेरच्या टप्प्यात आपला साथीदार सोडून गेल्यामुळे सदाशिव जाधव यांनी प्राण सोडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांच्याही पार्थिवांवर गुरुवारी सकाळी 9 वाजता होळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुली चार मुले असा परिवार आहे.
विशेष म्हणजे, सदाशिव जाधव यांनी शेवटपर्यंत पायी प्रवास केला. हातात काठी घेऊन ते आपल्या बाभळगाव, शिवणी आणि खरोळा येथील मुलीकडे पायीच जात होते. वाहनाने प्रवास करणे त्यांनी कायम टाळल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.
पदरात कायम असायची भाकर!
जाधव दाम्पत्य यांनी लातूर जिल्ह्यातील बाभळगाव, शिवणी आणि खरोळा गावात आपल्या मुली दिल्या होत्या. त्यांच्याकडे जाण्यासाठी कायम त्यांच्याकडे जाताना पदरात भाकर बांधून असायची. बाहेरचे खाणे कायम टाळले. दोघेही घरातील भाकर बांधूनच घराबाहेर पडत असत. शेवटच्या श्वासापर्यंत व्यसनापासून दूर राहत घराबाहेरील खाणे त्यांनी टाळले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Latur