ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी
लातूर, 24 मार्च: प्रत्येक व्यक्तीला एखादा छंद असतोच. मात्र, काहीजण आपला हा छंद जोपासतात. त्यासाठी वेळ, श्रम आणि पैशाचीही गुंतवणूक करतात. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील शिक्षक सौदागर बेवनाळे यांनी एक अनोखा छंद जोपासला आहे. त्यांनी 5 हजार दूर्मिळ नाण्यांचे संकलन केले आहे. विशेष म्हणजे यातील काही नाणी ही इसवी सन पूर्व काळातील असून त्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना इतिहास शिकवत आहेत.
दूर्मिळ नाण्यांची 49 शहरांत प्रदर्शने
सौदागर बेवनाळे हे पेशाने शिक्षक आहेत. त्यांनी भारतीय आणि विदेशी नाण्यांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे 5 हजार दूर्मिळ नाण्यांचे संकलन केले आहे. भारतात आतापर्यंत जेवढी परकीय आक्रमणे झाली तेवढ्या राजांची नाणी त्यांनी संग्रहित केली. तसेच ऐतिहासिक नाणी, नोटा, शिवकालीन शस्त्र यांचाही संग्रह केला. इतिहास व संस्कृतीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी त्यांनी विविध 49 शहरांत प्रदर्शन भरवले आहेत.
या राज्यांच्या नाण्यांचा संग्रह
पेशवे, इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, उदयपुरचे महाराणा प्रताप चौहान, यांसह बिकानेर, जयपूर, हैद्राबाद, अहमदनगर, कच्छ, जाबरा, टोंक, देवास, त्रावनकोर, यासारख्या अनेक संस्थांनाची नाणी बेवनाळे यांच्या संग्रहात आहेत. तसेच जगातील विविध देशांच्या नाण्यांचाही संग्रह त्यांनी केला आहे.
विविध बाँड, नोटांचाही संग्रह
बेवनाळे यांच्या संग्रहात विविध देशाचे बाँड, नोटा, पोस्टकार्ड असून त्याचे ते योग्य संगोपन करतात. आपल्या महाराष्ट्र राज्याचे आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले आहेत त्यांचे जन्म दिनंकाच्या नोटा त्यांनी त्यांच्या माहिती सोबत लावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व राजमुद्रा त्यांच्या काळातील भाला, धोप तलवार, गजभाला आणि विविध प्रकारच्या कट्यार त्यांच्या जवळ आहेत.
मुलींच्या शिक्षणासाठी 'सायकल बँक' ठरली वरदान, पाहा कसा झाला बदल!
नाणी संग्रहास अशी झाली सुरुवात
बेवनाळे यांच्या घरात धोप तलवार आणि काही तांब्याची नाणी होती. त्यामुळे नाण्यांचा संग्रह करण्याचा छंद त्यांना लागला. यातूनच जगातील 5 हजार दुर्मिळ नाणी संग्रहित केली. तसेच विद्यार्थ्यांना इतिहास व संस्कृतीचे शिक्षण देण्यासाठी या नाण्यांचा वापर सुरू केला. पुढील पिढीला त्या त्या काळातील संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी नाण्यांचा उपयोग होतो आहे, असे बेवनाळे सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: History, Latur, Local18, School teacher