बारामती, 29 जून: बारामतीच्या (Baramati) लता करे (lata kare) आजी यांनी मॅरेथॉन स्पर्धा जिंकून अवघ्या महाराष्ट्राला आपली दखल घेण्यास भाग पाडले. पण, त्यामागील त्यांचा संघर्ष सर्वांच्या मनाला स्पर्श करून गेला. नुकताच लता करे यांनी इंडियन आयडॉलच्या (Indian idol) मंचावर हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा संघर्ष ऐकून गायिका सोनू कक्कर (Sonu Kakkar) यांनी 1 लाख 21 हजार रूपयांची आर्थिक मदत दिली.
बारामती येथील लता करे 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. बारामतीमधील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना त्यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले. पतीच्या उपचारासाठी वयाच्या 64 व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांनी मिळविलेल्या विजयानंतर सर्वत्र त्यांचे मोठे कौतुक झाले.
त्यानंतर सलग 3 वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रीक साधली. पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहुन त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील काढण्यात आला आहे. 'लता भगवान करे, एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
इंडीयन आयडॉल हा गाण्याच्या रिॲलिटी शोमध्ये देशभरातून स्पर्धक सहभागी झाले असून या मध्ये गायिका सोनू कक्कर, हिमेश रेशमिया,अनु मलिक जज्ज म्हणून काम पाहत आहे. तर आदित्य नारायण कार्यक्रमाचे होस्ट म्हणून काम पाहत आहेत.
नुकत्याच झालेल्या सिनियर सिटिझन एपिसोडमध्ये लता करे या शोमध्ये स्पर्धक असलेल्या पवनदीप राजन (Pawandeep Rajan Indian Idol) या स्पर्धकाला सपोर्ट करण्यासाठी सहभागी झाल्या होत्या. यावेळी करे यांची जीवनाची व्यथा ऐकून गायिका सोनू कक्कर यांनी तत्काळ आर्थिक मदतीचा धनादेश करे यांना सुपूर्द केला. यावेळी उपस्थित सर्वच भारावून गेले होते. तर करे यांनी केलेल्या फर्माईशवर गायक पवनदीप राजन याने "जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जित है" हे गाणे गात खुश केले. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baramati, Maharashtra, Sonu kakkar