साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 22 जून : दूरशिक्षण किंवा मुक्त विद्यापीठाच्या मार्फत शिक्षण घेतेवेळी बऱ्याचदा त्याला मर्यादा येतात. विद्यार्थ्यांना शिक्षणा वेळी काही गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे दिवसभर काम करुन संध्याकाळच्या वेळी शिक्षण घेण्याची दुसरी एक सुविधा कोल्हापुरात नाईट महाविद्यालयाच्या माध्यमातून मिळते. बारावी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण देखील या ठिकाणी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात तासाला बसूनच घेता येते. सध्या कोल्हापुरातील या नाईट महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून या ठिकाणी विद्यार्थी गर्दी करत आहेत. कधी झाली महाविद्यालयाची सुरुवात? कोल्हापुरात कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूर हे महाविद्यालय सन 1971 रोजी सुरू झाले. विद्यार्थ्यांना दिवसा काम करुन शिक्षणापासून वंचित न राहता शिक्षण घेता यावे, यासाठी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी या महाविद्यालयाची स्थापना केली होती. तेव्हापासून आजतागायत दिवसा काम करून संध्याकाळी विद्यार्थी येथे शिक्षण घेतायत. या महाविद्यालयात आर्ट्स शाखेत अकरावी ते पदव्युत्तर आणि कॉमर्स शाखेत अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण येथे पूर्ण करता येते.
अशी आहे महाविद्यालयाची प्रगती हे महाविद्यालय जेव्हा सुरू झाले तेव्हा विद्यार्थ्यांची फक्त 38 पटसंख्या होती. मात्र सध्या 900 विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. एकूण शिक्षकांपैकी 80 टक्के शिक्षक हे डॉक्टरेट पदवीधारक आहेत. तसेच शैक्षणिक बाजू बरोबरच या महाविद्यालयाने क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात देखील उल्लेखनीय प्रगती आजवर केली आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. जे. फराकटे यांनी सांगितले आहे. किती आहे फी या महाविद्यालयात अकरावीमध्ये प्रवेश घेताना गरीब विद्यार्थ्यांना सवलत देखील दिली जाते. त्यांची अकरावी आणि बारावी साठीची सवलत फी ही 465 रुपये आहे. तर पदवीसाठी आरक्षित प्रवर्गासाठी 1255 आणि विना आरक्षित जागेसाठी जवळपास 2000 रुपये फी आकारली जाते, असेही डॉ. फराकटे यांनी सांगितले.
JOB ALERT: या शासकीय संशोधन संस्थेत नोकरीची संधी; Diploma इंजिनिअर्ससाठी ओपनिंग्स; करा अप्लाय
काय असते या महाविद्यालयाची वेळ नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स हे संध्याकाळच्या वेळी भरते. या महाविद्यालयाची वेळ सायं. 4.30 ते रात्री. 9.30 असली तरी कार्यालय हे दुपारी 2.30 पासून सुरू असते. ज्युनियर कॉलेजचे तास सायं. 5.15 ते रात्री. 9.30 पर्यंत असतात. तर सिनियर कॉलेजचे तास हे सायं. 6 ते रात्री. 9.30 पर्यंत भरत असतात. कॉलेज जरी रात्रीच्या वेळी भरत असले तरी हे कॉलेज शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत असल्यामुळे येथे होणाऱ्या मुख्य परीक्षा दिवसाच पार पडत असतात. या महाविद्यालयात कोणकोण घेऊ शकते प्रवेश? या महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपली परिस्थिती सांभाळत दिवसभर काम करून संध्याकाळच्या वेळेला आपले शिक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये काही वयोवृद्ध विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. तर नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत देखील एका आई आणि मुलाने एकत्रितरित्या या महाविद्यालयामधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. ज्यांना नोकरी किंवा काम करत आपले शिक्षण पूर्ण करायचे आहे त्यांना आणि ज्यांना आपले अपुरे शिक्षण पूर्ण करायचे आहे त्यांना अशा सर्वांना या महाविद्यालयात शिक्षण घेता येते, असे डॉ. फराकटे यांनी स्पष्ट केले आहे.
Career Tips: ग्रॅज्युएशननंतर नक्की करावं तरी काय? हे सर्टिफिकेशन कोर्सेस करा; लाखोंमध्ये मिळेल सॅलरी
कशी आहे प्रवेश प्रक्रिया ? या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी महाविद्यालयाला भेट देऊन कार्यालयातून मिळणारा अर्ज भरून द्यावा लागतो. त्याचवेळी महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन हे करतात.
महाविद्यालयाचा पत्ता : नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, आझाद चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर - 416002 संपर्क : 0231 264 0157