साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 11 मार्च : शेतकऱ्यासाठी हा आठवडा त्रासदायकच ठरला. राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिंक खराब झाली. आगामी आठवड्यातही काही दिवस ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज कोल्हापूरच्या ग्रामीण कृषी हवामान विभागानं दिलाय. त्यांनी शेतकऱ्यांना पिकाची काळजी कशी घ्यावी याबाबत काही टिप्स दिल्या आहेत.
कसं असेल हवामान?
कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथील विभागीय विभगीय कृषी संशोधन केंद्र मार्फत ही माहिती देण्यात आली आहे. केंद्राला प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार 14 मार्चपर्यंत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये आकाश मुख्यतः स्वच्छ असेल, तर , सातारा जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्हयामध्ये दिनांक 15 मार्च रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची देखील शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 34०° ते 35.०° सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात कमाल तापमान 34.०° ते 36.०° आणि सातारा जिल्ह्यामध्ये कमाल तापमान 34.० ते 36.०° सेल्सिअस दरम्यान तसेच किमान तापमान अनुक्रमे 15° ते 21°, 19° ते 20° आणि 17° ते 19° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
टोमॅटोला फक्त 2 रुपये किलो भाव, निराश शेतकऱ्यानं पिकांमध्ये सोडली जनावरं!
'या' पिकांची घ्या काळजी
रब्बी ज्वारी : पक्व होत असलेल्या ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षण करावे. तसेच ज्वारीच्या दाण्याच्या टोकाजवळ काळ्या ठिपक्याची लक्षणे दिसताच ज्वारीची काढणी करावी, 8 ते 10 दिवस कणसे उन्हात वाळवावीत.
गहू : गहू पिकाची कापणी पिक पक्व होण्याच्या २-३ दिवस आधी करावी त्यामुळे गव्हाचे दाणे शेतात झडण्याचा प्रकार आढळत नाही. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 15 % असावे.
हरभरा : लवकर लागवड केलेल्या व पक्त झालेल्या हरभरा पिकाची काढणी व मळणी करावी, मळणी केलेले हरभरा /धान्य उन्हामध्ये 6 ते 7 दिवस वाळवावे आणि सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे. साठवणूक करताना त्यामध्ये 5% कडुनिंबाचा पाला घालावा त्यामुळे कीड लागत नाही.
भुईमूग : उन्हाळी भुईमुग पिकास जमिनीच्या मगदुरानुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. भुईमुग पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी ०.5% लोह व ०.2 % झिंक सल्फेट या मिश्रणाची पेरणीनंतर 30 दिवसांनी फवारणी करावी.
ऊस : खोड किडीच्या नियंत्रणासाठी ऊस लागणीनंतर 45 दिवसांनी उसाची बाळ बांधणी करावी. उसात मका, ज्वारी हि आतरपिके न घेता, कोथिंबीर व पालक हि आंतरपिके घ्यावीत. खोड किडग्रस्त ऊस देठ मुळासह उपटून अळीसह नष्ट करावा. हेक्टरी 5 फुले ट्रायकोकार्ड 10 दिवसांच्या अंतराने 3 वेळा लावावीत.
मिरची : मागील आठवड्यामधील कोरड्या हवामानामुळे मिरची पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रीन 30% ई.सी. 5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतामध्ये पिवळे चिकट सापळे एकरी 10 ते 12 या प्रमाणात लावावेत.
वांगी : मागील आठवड्यामधील कोरड्या हवामानामुळे मिरची पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन 25% ई.सी. 4 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टोमॅटो : वान्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने टोमॅटो पिकास काठीचा आधार द्यावा. टोमॅटो पिकावर फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी पिकावर हेलिओथिस नुक्लीअर पॉलिहेड्रोसीस व्हायरस (एच.ए.एन.पी.व्ही.) विषाणू 200 मिली प्रती 200 लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळी फवारावे.
हळद : हळद पिकाची काढणी जातीनुसार पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यावर करावी, काढणीपूर्वी जमिनीच्या प्रतीनुसार 15 ते 20 दिवस पाणी देणे बंद करावे. काढणी केलेल्या हळदीची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
अवकाळी पावसानं आणलं डोळ्यात पाणी, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला!
कांदा : कांदा पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी @४० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
आंबा : आंबा पिकामधील फळगळ कमी करण्यासाठी उपलब्धतेनुसार प्रत्येक झाडास १०० लिटर पाणी प्रती आठवडा आंबा फळे वाटाण्याच्या ते सुपारीच्या आकाराच्या दरम्यान असताना दयावे, साधारणतः अंड्याच्या आकाराच्या फळांना फळ माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फळगळ झालेली असल्यास पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत व रक्षक फळ माशी सापळे @२ प्रती एकर या प्रमाणात लावावेत.
पशुधन : लाळ खुरकुत रोगापासून बचावासाठी निरोगी जनावरांना लाळ खुरकुत रोगाची रोगप्रतिबंधक लस मार्च महिन्यामध्ये अधिकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने टोचून घ्यावी. 3 महिन्याच्या आतील तसेच गाभण जनावरांना लस देणे टाळावे. म्हशींना धर्मग्रंथी खूप कमी असल्याने व त्यांची त्वचा काळी असल्याने वाढणाऱ्या तापमानाचा गायपेक्षा म्हशींना त्रास जास्त होतो. म्हणून म्हशींना पाण्यात डुंबन्यास सोडावे.
(टीप : वरील सर्व माहिती ग्रामीण कृषि हवामान सेवा ऐएमएफयु कोल्हापूर, विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer protest, Kolhapur, Local18, Weather Forecast