शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही अनेकदा नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते.
यंदा वरुण राजानं चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. मात्र बीड जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला.
अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
या पावसामुळे मातकुळी या गावातील संत्रा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. झाडांच्या खाली संत्र्यांचा सडा पडला आहे.
मातकूळी या गावात बापू जरे यांनी साडेचार एकरावर संत्र्याची बाग लावली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे चार वर्षे ही बाग जोपासली.
बागेतून 14 टन संत्र्यांचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. ही सर्व संत्री खराब झाल्याने जवळपास 25 लाखांचा फटका बसला आहे.
रात्रंदिवस मेहनत करून वाढवलेले पीक अवकाळी पावसाने नष्ट केले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यांना सरकारी मदतीची गरज आहे.