कोल्हापूर, 03 डिसेंबर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. शेकडो लोक इथे देवीला अभिषेक करण्यासाठी येत असतात. आता याच अभिषेक करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना देवीचा प्रसाद या रुपाने झाडाची रोपे देण्यात येणार आहेत. वृक्षप्रसाद असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि सिने अभिनेते सयाजी शिंदे आणि मनोज वाजपेयी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सांयकाळी पार पडला आहे. स्थानिक देशी झाडे मोठ्या प्रमाणात लोकांनी लावावीत, त्याची उपयुक्तता समजावी, यासाठी कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरामध्ये वृक्षप्रसाद योजने अंतर्गत भाविकांना झाडाच्या स्वरूपात प्रसाद म्हणून कलशामध्ये रोप देण्यात येणार आहे. हा उपक्रम पश्चिम महाराष्ट्रदेवस्थान व्यवस्थापन समिती, सामाजिक वनीकरण विभाग, कोल्हापूर हे संयुक्तपणे राबवणार आहेत.
Manoj Bajpayee: अभिनेते मनोज बाजपेयी अंबाबाईच्या चरणी; कोल्हापुरातील प्रसिद्ध मंदिरात केलं ध्यान
सह्याद्री देवराई संस्थेकडे अशा योजनेसाठी महाराष्ट्रातील एकूण 77 देवस्थानांचे प्रस्ताव आले आहेत. मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर, पुण्यातील श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर अशा महाराष्ट्रातील तीन देवस्थानांच्या माध्यमातून ही वृक्ष प्रसादाची योजना सध्या राबवली जाणार आहे. कशी सुचली कल्पना? या वृक्ष प्रसाद योजनेसंदर्भात काही महिन्यांपूर्वी पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि सयाजी शिंदे यांची बैठक झाली होती. त्यानुसार नियोजन करुन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच जेव्हा सयाजी शिंदे हे अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांना प्रसाद म्हणून श्रीफळ हाती देण्यात आले होते. यावरुनच त्यांना तेव्हा झाडाची रोपे प्रसादाच्या स्वरुपात देता येऊ शकतात, अशी कल्पना सुचली होती, असे सयाजी शिंदे यांनी बोलताना सांगितले. कोणकोणती रोपे दिली जाणार? सुरुवातीला अभिषेकासाठी येणार्या भाविकांना ‘म्हाळूंग’ या फळाची रोपे देण्याचा विचार होता. आता यामध्ये म्हाळूंग यासोबतच जास्वंदी, कणेरी,रिटा, गुळवेल, अर्जुन, अडुळसा, कडुलिंब, आंबा, जांभूळ सीताफळ, आवळा, चिंच, चाफा, बकुळ, नागकेशर, कडीपत्ता, बहावा, कांचन, सीता, अशोक, पारिजातक, तुळस, लिंबू, बेल इ. देशी उपयुक्त रोपे देण्यात येणार आहेत. या उपक्रमातून स्थानिक देशी उपयुक्त झाडांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होईल. भाविक ही रोपे आपल्या अंगणात, टेरेसवर, कुंडीमध्ये, शेताच्या बांधावर श्रद्धायुक्त भावनेने लावतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
अंबाबाईचा प्रसाद : मंदिराच्या ग्रंथालायाला मिळाली 18 व्या शतकातील दुर्मिळ हस्तलिखत
संस्थेमार्फत 6 लाखांपेक्षा जास्त झाडे आली लावण्यात
सयाजी शिंदे यांनी स्थापन केलेली सहयाद्रि देवराई सामाजिक संस्था ही गेली 5 वर्ष वृक्ष लागवड, वृक्ष प्रसार व संरक्षण व संवर्धन या क्षेत्रात काम करीत आहे. संस्थेने महाराष्ट्रातील 14 विविध जिल्ह्यांमधून 40 हून अधिक देवरायांची निर्मिती स्थानिक समुदायाशी संलग्न करून केली आहे. यामध्ये स्थानिक देशी झाडांचीच लागवड करण्यात आली आहे. तर संस्थेमार्फत 6 लाखांपेक्षा जास्त झाडे लावली असून वितरीत देखील करण्यात आली आहेत. रोपांना केलं जाईल ट्रॅक वृक्ष प्रसाद म्हणून कलशातून देण्यात येणाऱ्या या रोपांना ट्रॅक देखील केलं जाणार आहे. त्यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन बनवण्यात येत आहे. त्याद्वारे ही रोपे नेमकी कोणी नेली, कोणत्या देवळातून नेली, कुठे लावली, त्याचबरोबर त्या रोप नेणाऱ्या व्यक्तीने त्या रोपाचे नीट संगोपन केले आहे की नाही, ही सर्व माहिती कळणार आहे, असे देखील सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.