कोल्हापूर, 28 जानेवारी : कोल्हापुरात रिक्षा सौंदर्य स्पर्धा जिंकली की राज्यभरात रिक्षाला मान असतो. अशी भावना प्रत्येक रिक्षा मालकांची असते. त्यामुळे कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत राज्यातील अनेक रिक्षा मालक सहभागी झाले होते.
महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे राजू जाधव 22 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन करतात. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे ही स्पर्धा झाली नाही. यंदा मोठ्या संख्येनं रिक्षाचालक या स्पर्धेत सहभागी झाले होते. आकर्षक सजावट आणि प्रवाशांसाठीच्या विविध सुविधांचा विचार करून बनविण्यात आलेल्या रिक्षा घेऊन हे रिक्षाचालक या स्पर्धेत उत्साहाने आणि हौसेने सहभागी झाले होते.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई, बेळगाव आणि अन्य शहरांमधूनही या स्पर्धेत रिक्षाचालक सहभागी झाले होते. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रिक्षाची अंतर्गत आणि बाह्य सजावट उत्तमोत्तम करण्यात आली होती. रिक्षाचालकांकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचाही विचार करून प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाइल चार्जर, पंखा, टिव्ही, फ्रिज, अशा विविध सुविधांबरोबर एक रिक्षाचालकाने तर लाईव्ह कॅमेरे आणि जीपीएस ट्रॅकर बसवले होते.
26 जानेवारीला कोल्हापूरकर जिलेबी का खातात? पाहा Video
या स्पर्धेतून महाराष्ट्र रिक्षा सुंदरी, कोल्हापूर रिक्षा सुंदरी किताब देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूरचे संकेत पोवार यांच्या रिक्षाने महाराष्ट्र सुंदरी आणि कोल्हापुरच्याच अनिकेत पोवार याच्या रिक्षाने कोल्हापूर सुंदरी हा किताब पटकावला, अशी माहिती देखील राजू जाधव यांनी दिली.
महाराष्ट्र रिक्षा सुंदरी किताब पटकाविलेल्या रिक्षाचालकाला चांदीचे मेडल, मानाचा फेटा, तर कोल्हापूर रिक्षा सुंदरी किताबाचा मानकरी ठरलेल्या चालकाला सन्मानचिन्ह, मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले. सन 2019 ते 2022 पर्यंतच्या रिक्षांचा एक गट आणि सन 2019 च्या आतील रिक्षांचा दुसरा गट करण्यात आला होता. या दोन्ही गटातील पहिल्या तीन विजेत्यांना 20,001, 11,001, 8,001 तर उत्तेजनार्थ 5,0001 अशी रोख बक्षिसं आणि ट्रॉफी देण्यात आली.
विंटेज रिक्षांचा समावेश
या स्पर्धेत पुण्याचे निलेश साळोखे हे रिक्षा चालक देखील सहभागी झाले होते. त्यांच्या 1957 मॉडेलच्या रिक्षाला 1954 चा विंटेज लूक त्यांनी दिला होता. यामध्ये रिक्षाचे आसन हे सागवानी लाकडापासून बनवले होते. ही रिक्षा बनवून घेण्यासाठी जवळपास साडे तीन ते चार लाख रुपयांचा खर्च त्यांनी केल्याची माहिती निलेश साळोखे यांनी दिली आहे.
Video : साध्या सायकलीचं इ-सायकलमध्ये रुपांतर करणारे कोल्हापूरचे सिक्युरिटी गार्ड!
चित्तथरारक कसरती..
या स्पर्धेवेळी संतोष जाधव यांनी दोन चाकांवर रिक्षा चालवणे, वेगात उलटी रिक्षा चालवणे अशा रिक्षाच्या चित्त थरारक कसरती करून दाखवल्या. या कसरती बघताना बघणाऱ्यांनी श्वास रोखला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Autorickshaw driver, Kolhapur, Local18, Riksha driver