सांगली, 25 जुलै : इस्लामपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. येथील शिवसेना नगरसेविकेच्या पतीस मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवकुमार दिनकर शिंदे हे मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. सात ते आठ जणांनी त्यांना मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे गटातील सांगलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप जखमी शिंदेनी केला आहे. शिंदे गटात सामील का होत नाही, असं विचारत त्यांना मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. सध्या जखमी शिंदेवर भारती हॉस्पिटलच्या ICU मध्ये उपचार केले जात आहे. त्यांच्या पायाला आणि हाताला जबर मारहाण करण्यात आली. यात त्यांचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला आहे. शिवसेना नगरसेविका, शिवसेना महिला आघाडी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांच्या पतीला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी पडझड झाली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुलाखतीतून भाष्य केलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये ही मुलाखत 26 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. ‘कुणाचे आयुष्य बरबाद करून तुम्हाला सुख लाभत असेल असं मला वाटत नाही. कुणाला मुख्यमंत्रिपद हवे होते, या रहस्यामध्येच उत्तर आहे. पण, माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असं उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.