भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 9 मे : सुख अनुभवण्यासाठी आणि सर्व काळजी विसरण्यासाठी संगीत हे महत्त्वाचं माध्यम आहे. संगीताची मदत घेतली जाते. प्रत्येक प्रांतानुसार बदलणाऱ्या भारतीय संस्कृतीप्रमाणे तेथील लोकवाद्य देखील वेगळी आहेत. या प्रत्येक वाद्यातून ताल आणि सुरांची झालेली निर्मिती ही अभूतपूर्व नादमय अनुभव देते. त्यामुळे मन प्रसन्न होते. काही वाद्य लोकप्रिय असली तरी ती वाद्ये सगळ्यांना वाजवता येणे कठीणच. डोंबिवलीतील कौस्तुभ दिवेकर हा हरहुन्नरी वादक त्याला अपवाद आहे. कौस्तुभ एक किंवा दोन नाही तर तब्बल 40 प्रकारची वाद्य वाजवतो. डोंबिवली हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखले जाते. या शहरात विविध कलाकार राहतात. कौस्तुभ देखील डोंबिवलीकरच. लहानपणापासून तबला वाजवण्याची आवड असणाऱ्या त्याने लोकवाद्यांबरोबरच वेस्टर्न ड्रमरच्या देखील 7 परीक्षा पूर्ण केल्या आहेत. तबला शिकता शिकता इतर ताल वाद्येही तो आवडीने वाजवू लागला. वेगवेगळ्या गुरूंकडे हे शिक्षण घेतल्याचं कौस्तुभनं सांगितलं.
कौस्तुभच्या घरी वाद्यांचा खजिना कौस्तुभच्या घरी या सर्व वाद्यांचा खजिना आहे. वाढदिवस किंवा सणाच्या प्रसंगी कपडे घेण्याच्या ऐवजी वाद्य घ्या असं तो आई-वडिलांना सांगत असे. तो दरवर्षी गणपतीला एक तरी वाद्य विकत घेतो, असं त्याच्या आईनं अभिमानानं सांगितलं. मी काही वाद्ये खास तयार करून घेतली असून या वाद्यांच्या माध्यमातून म्युझिक थेरपीही करतो. मी ही वाद्य जीवापाड जपली आहेत. त्यांना शास्त्रीय संगिताची साथ देण्यासाठी काही नोटेशनही तयार केली आहेत. पण, गुरुंना दाखविल्याशिवाय ही वाद्य वाजवत नाही,’ असं कौस्तुभनं सांगितलं. पखवाजच्या तालावर भजनाचा सूर, डोंबिवलीकरांची 30 वर्षांपासून अखंड सेवा, Video कौस्तुभकडे असलेल्या वाद्यांच्या खजिन्यातील शंख, दिमडी, मोरसिंग, तुतारी, संबळ आणि चोंडका ही वाद्य त्यानं ‘न्यूज 18 लोकमत’ च्या प्रेक्षकांसाठी वाजवून दाखवली. तसंच त्याची माहितीही सांगितली. दिमडी : हे वाद्य जागरण या लोककला प्रकारातील प्रमुख वाद्य असले तरी शाहिरी, पोवाडा, भजन यामध्ये हे वाजवले जाते. चोंडका : तमाशा, गोंधळ, पोवाड्यामध्ये वाजविण्यात येणारे चोंडका हे वाद्य वाजवायला कठीण असले तरी ते ऐकायला अत्यंत गोड वाटते. चोंडका वाजवण्यासाठी दोन्ही हाताचा एका लयीत वापर करावा लागतो. तुतारी : कौस्तुभनं त्याच्याकडील तुतारी ही साताऱ्याहून बनवली आहे. ही तुतारी बनवताना एका पत्र्याचा वापर केवा असून ती त्यामध्ये त्याच्या शक्तीनुसार शिसं भरली आहेत. त्यामुळे ती अधिक सुरात वाजते. मोरसिंग : हे राजस्थानी वाद्य असलं तरी ते कर्नाटकी शास्त्रीय संगितामध्येही वाजवले जाते, असं कौस्तुभनं स्पष्ट केलं. त्याचबरोबर त्यानं यावेळी संबळ आणि शंखही वाजवला.

)







