साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 06 मार्च : कोल्हापूर हा पर्यटनाच्या दृष्टीने सुजलाम सुफलाम असा जिल्हा आहे. अनेक अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्या संस्कृतीची ओळख करून देतात. या पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याची जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एका छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे व पर्यटन विषयक बाबींवर आधारित ‘विविधरंगी कोल्हापूर..!’ ही छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून निवड होणाऱ्या छायाचित्रांचा समावेश जिल्ह्याच्या कॉफी टेबल बुक (छायाचित्र पुस्तिका) मध्ये छायाचित्रकारांच्या नावासह करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व निवड झालेल्या छायाचित्रांसह अंतिम निवड करण्यात आलेल्या प्रत्येक छायाचित्रांना विशेष पारितोषिकही देण्यात येणार आहे.
कधी पर्यंत आहे मुदत ? या स्पर्धेसाठी छायाचित्र पाठविण्याची अंतिम मुदत 13 मार्च 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आहे. दरम्यान या स्पर्धेची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाच्या
www.kolhapur.gov.in
या संकेतस्थळावर
https://kolhapur.gov.in/en/notice/vividharangi-kolhapur-photography-competition-2023/
या लिंकवर उपलब्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्याची पर्यटनविषयक आकर्षक छायाचित्रे जगासमोर यावीत व जगभरातील पर्यटकांनी कोल्हापूरला भेट द्यावी, यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. कसा घ्यावा सहभाग ? या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली छायाचित्रे जिल्हा प्रशासनाच्या इन्स्टाग्राम #destinationkop #tourismkop तसेच फेसबुक पेज #koptourism #destinationKOP ला टॅग करावे. त्याचबरोबर आपल्या छायाचित्राला ठिकाण विषयानुसार हॅशटॅग देणेही बंधनकारक आहे. छायाचित्र स्वतः काढले असल्याचे प्रतिज्ञापत्र PDF फॉरमॅटमध्ये साध्या कागदावर सोबत पाठवावे. प्रतिज्ञापत्र व प्रवेश अर्ज सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात vividhrangikolhapur@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावे. छायाचित्राची निवड झाल्यानंतर ते छायाचित्र मूळ साईजमध्ये vividhrangikolhapurphotos@gmail.com या ईमेल आयडीवर पाठविण्यासाठी समितीमार्फत संबंधितांशी संपर्क साधण्यात येईल.
ताडोबाच्या जंगलात एकत्र दिसली वाघाची संपूर्ण फॅमिली! पाहा दुर्मीळ Photos
काय आहेत पारितोषिके ? कॉफी टेबल बुकसाठी अंतिम निवड करण्यात आलेल्या प्रत्येक छायाचित्रासाठी 3 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांपैकी सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारांना खालीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येतील. १) प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये २) व्दितीय पारितोषिक 35 हजार रुपये ३) तृतीय पारितोषिक 21 हजार रुपये ४) उत्तेजनार्थ पारितोषिक 15 हजार रुपये ५) उत्तेजनार्थ पारितोषिक 15 हजार रुपये