जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur News : 'आमच्यासोबत या तरच मैत्री टिकेल' मुश्रीफांची सतेज पाटलांना थेट ऑफर, पाटील म्हणाले..

Kolhapur News : 'आमच्यासोबत या तरच मैत्री टिकेल' मुश्रीफांची सतेज पाटलांना थेट ऑफर, पाटील म्हणाले..

मुश्रीफांची सतेज पाटलांना थेट ऑफर

मुश्रीफांची सतेज पाटलांना थेट ऑफर

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ सत्तेत सहभागी झाल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांना सोबत येण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 22 जुलै : आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी फुटल्यानंतर आता काँग्रेसही फुटणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगतायेत. त्यातच नुकतेच सरकारमध्ये सामील झालेल्या हसन मुश्रीफांनी काँग्रेसचे माजी आमदार सतेज पाटलांना थेट सोबत येण्याची ऑफर दिल्याचं समोर आलंय. पण, सतेज पाटलांनी मुश्रीफांची ऑफर नाकारल्यानं, त्यांची दोस्ती टिकणार की तुटणार? अशी चर्चा सुरू झालीय. ‘आमच्यासोबत या तरच मैत्री टिकेल’ कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची दोस्ती सर्वश्रुत आहे. मुश्रीफ यांची राष्ट्रवादी आणि सतेज पाटील यांच्या काँग्रेस पक्षाची विचारधारा एकच असल्यानं या दोघांना जिल्ह्याचे राजकारण एकत्र करणे सोपे झालं. त्यातून त्यांनी जिल्ह्यात भाजपला रोखण्यासोबत सहकार क्षेत्रात आपला दबदबा ठेवल्याचं पाहायला मिळत होतं. हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री असतानाही त्यांना राज्यमंत्री असलेल्या सतेज पाटलांसाठी पालकमंत्रीपद सोडत, त्यांच्यातील मैत्री जगजाहीर झालेली. आता मात्र मुश्रीफ यांनी वेगळी वाट धरल्यानं या दोघांच्या दोस्तीत दुरावा निर्माण झालाय. पण, अशाही स्थितीत मुश्रीफांनी सतेज पाटलांना सोबत येण्याची ऑफर देऊन खळबळ उडवली होती. एवढंच नाही, तर सोबत आलात तरच आमची मैत्री टिकेल असा इशाराही मुश्रीफांनी दिलेला. वाचा - ‘….म्हणून BMC मध्ये ऑफिस’, मंगलप्रभात लोढा यांचा आदित्य ठाकरेंवर जोरदार पलटवार मुश्रीफ यांची ही ऑफरला सतेज पाटलांनी मात्र धुडकावून लावली. आपण महाविकास आघाडी सोबतच कायम राहणार असल्याचं स्पष्ट करत, काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नसल्याचा दावाही सतेज पाटलांनी केलाय. एकंदरीतच, बदलेल्या राजकारणामुळे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातल्या दोस्तीत दुरावा निर्माण झालाय. सतेज पाटलांनी ऑफर नाकारल्यानं आता या दोघांची दोस्ती तुटणार की स्थानिक राजकारणात दोघी काही तडजोडी करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात