मुंबई, 5 जुलै : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. विशेषत: कोकणात आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडवून सोडली आहे. कोल्हापूरमध्ये तर पाऊस प्रचंड कोसळतोय. हा पाऊस रात्रभर असाच सुरु राहिला तर सकाळपर्यंत पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे कोकणात पावसाचा प्रचंड हाहाकार सुरु आहे. कोकणात अनेक नद्यांना पूर आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची देखील माहिती समोर येत आहे. काही भागांमध्ये दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे धाकधूक वाढली आहे.
ज्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो त्या ठिकाणी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून देवाकडे पाऊस थांबण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. विशेष म्हणजे या सर्व नागरिकांसाठी प्रशासनदेखील सतर्क आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर जनावरांना दुसरीकडे स्थलांतरीत केलं जाणार आहे. त्याबाबतची पूर्वसूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता. 🌧🌧 📢 कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचे इशारे. 🌊🌊कोकणात पूर परिस्थिती अनेक ठिकाणी... https://t.co/kxlIAKcXa7
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून याबाबतची माहिती जारी करण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या पाच जिल्ह्यांसाठी 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यात 8 जुलैसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी 9 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
(ठाण्यात खड्ड्याने घेतला पहिला बळी, दुचाकी खड्ड्यात, तरुण जमिनीवर, मागून एसटी, भयानक दुर्घटना)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या पाच दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे धुळे, नंदूरबार जिल्ह्यात येल्लो आणि ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापुरात संभाव्य परिस्थिती पाहता NDRF च्या दोन टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain, Rain updates