जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बाबा गेले, आईलाही हवीये साथीदाराची गरज; कोल्हापूरच्या लेकाने जाणलं आईचं मन

बाबा गेले, आईलाही हवीये साथीदाराची गरज; कोल्हापूरच्या लेकाने जाणलं आईचं मन

बाबा गेले, आईलाही हवीये साथीदाराची गरज; कोल्हापूरच्या लेकाने जाणलं आईचं मन

राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी नगरीत हे क्रांतिकारक पाऊल पडले.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 17 जानेवारी : आईवडील हे मुलांचे लग्न लावून देतात. मात्र, कोल्हापुरात एका तरुणाने आपल्या वडिलांच्या निधनानंतर आईचा पुनर्विवाह लाऊन देण्याचे क्रांतिकारक पाऊल उचलले. कोल्हापुरातील युवराज शेले या तरुणाने हा धाडसी निर्णय घेतला. मागील दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमध्ये रत्ना शेले यांच्या सख्ख्या बहिणी आणि भावांचं एकूण अशा तब्बल सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर पतीचंही अपघाती निधन झालं. त्यामुळे हतबल झालेल्या रत्ना यांना सावरण्यासाठी मुलाने आईचा दुसरा विवाह करून देण्याचा चंग बांधला होता. तसेच 12 जानेवारीला त्याचा तो निर्णय पूर्ण झाला.

राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी नगरीत हे क्रांतिकारक पाऊल पडले आणि त्याचे कौतुक सर्वत्र होऊ लागले. कष्टकरी तरूणानं, अनिष्ठ रूढींचं ओझं फेकून देत, एक वेगळा विचार कृतीत आणला. त्यातून खर्‍या अर्थानं माणुसकी, स्त्री सन्मान आणि भावनांचा आदर पहायला मिळाला. करवीर तालुक्यातील शिंगणापूर मधील युवराज हा आई आणि वडिलांसोबत राहत होता. त्याचे वडिल नारायण शेले सेंट्रींग काम करत होते. मात्र, 26 जुलै 2022 ला त्यांना एका वाहनानं धडक दिली. यानंतर उपचार घेत असताना दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. यानंतर युवराज आणि त्याच्या आईवर जणू आभाळ कोसळलं. त्याची आई तर या अपघातामुळं खचून गेली. एका खासगी रक्तपेढीमध्ये काम करून आणि सायंकाळच्या वेळीस नृत्य कलाकार म्हणून काम करत उदरनिर्वाह करणार्‍या युवराजनं, स्वतःला सावरत आईला धीर दिला. मात्र, या दुःखातून युवराजची आई बाहेर येत नव्हती. कुटुंब प्रमुखावर काळानं घातलेला घाला, आईचं वैधव्य, त्यातून घरात साचलेलं नैराश्य अशा गोष्टी युवराज अनुभवत होता. हेही वाचा -  Dog Show : माणसांनाही लाजवेल अशी शिस्त; सातारा अन् कोल्हापूरमध्ये होती चुरस, पाहा कुठला डॉग जिंकला? काल परवापर्यंत हसत खेळत काम करणारी त्याची आई अगदीच अबोल झाली होती. एकटी पडली होती. कुंकू नसलेलं कपाळ आणि बांगड्याविना सुने सुने दिसणारे आईचे हात युवराजच्या मनाला अगणित वेदना द्यायचे. शेवटी खुप विचार करून, युवराजनं थेट आपल्या आईचा पुनर्विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय ऐकल्यावर समाज काय म्हणेल, असं सांगून आईनं पुनर्विवाहाला स्पष्ट नकार दिला. मात्र, युवराज आपल्या निर्णयावर ठाम होता. युवराज यांच्या लांबच्या नातेवाईकांपैकी, कर्नाटकातील करजगा गावचे मारूती व्हटकर यांचा 2 वर्षापूर्वी घटस्फोट झाल्यानं तेही एकटेच होते. आपल्या आईचा विवाह, मारूती यांच्याशी करण्याचा निर्णय घेवून युवराजनं त्यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची जाणीव करून देवून, युवराजनं मारूती यांना विवाहासाठी तयार केलं आणि दोघांची संमती मिळाल्यावर, गुरूवारी 12 जानेवारीला शिंगणापूरमध्ये आपल्या आईचा पुनर्विवाह युवराजनं लावून दिला. या विवाहामध्ये त्यांच्या गल्लीतील नागरिकांनीही मोठी मदत केली. 38 वर्षीय आईच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा आणि वृध्दत्वामध्ये जोडीदाराची लागणारी गरज या गोष्टी पटवून देवून, युवराजनं आपली आई रत्ना यांना पुनर्विवाहासाठी अखेर तयार केलं. कोल्हापूरच्या तरुणाने घेतला हा धाडसी निर्णय ज्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला त्या समाज सुधारकांच्या कार्याला मिळालेली चालना देणारा ठरला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात