कोल्हापूर, 10 जुलै : कोल्हापूर वस्तूसंग्रहालय अर्थात टाऊन हॉल वस्तूसंग्रहालय हे जवळपास दोन हजार वर्षांचा इतिहास जपणारं कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. इसवी सन 200 ते इ.स. पूर्व 200 या काळातला ऐतिहासिक ठेवा या वस्तू संग्रहलयात ठेवण्यात आला आहे. याच ऐतिहासिक वस्तुंपैकी काही वस्तू या जगभरातील लोकांना पाहता येणार आहेत. अमेरिकेतील एका प्रदर्शनात या वस्तू मांडल्या जाणार आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित ‘द मेट म्युझियम अर्थात द मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’ या संग्रहालयात भरवल्या जाणाऱ्या एका प्रदर्शनात या कोल्हापुरातील वस्तू मांडल्या जाणार आहेत. प्राचीन बौद्ध संस्कृतीवर आधारित ‘इव्हॉल्यूशनर ऑफ बुद्धिष्ट आर्ट इन इंडिया’ या विषयावर आधारित हे प्रदर्शन असणार आहे. दि. 17 जुलै ते 13 नोव्हेंबर 2023 या कालावधीत हे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या प्रदर्शनात कोल्हापूरच्या वस्तू संग्रहलयातील काही वस्तू असणार असल्यामुळे कोल्हापूरची संस्कृती आता जगभर प्रदर्शित होणार आहे.
कोणत्या आहे ऐतिहासिक वस्तू? या प्रदर्शनात टाऊन हॉल वस्तू संग्रहालयातील आठ ऐतिहासिक कलाकृती असणार आहेत. यामध्ये प्राचीन समुद्रदेवतेची प्रतिमा, हत्तीवरील स्वार, रोमन पदक, जैन मंगलाष्टका, जुने जगाचे हँडल, एक भांडे, हत्ती स्वार, गदेच्या मुठीवरील रिंग या आठ प्राचीन वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूहे कोल्हापूरच्या ब्रह्मपुरी टेकडीतील उत्खननात सापडल्या होत्या. इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 काळातील या वस्तू असल्याचे अभ्यासकांचे मत आहे, अशी माहिती कोल्हापूर संग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे यांनी दिली आहे. कसे आहे कोल्हापूर वस्तू संग्रहालय? टाऊन हॉल म्युझियम अर्थात कोल्हापूर वस्तुसंग्रहालय हे 30 जानेवारी 1946 रोजी स्थापन झाले आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या काठावर प्राचीन ब्रम्हपूरी टेकडी परिसरात 1945-46 च्या दरम्यान उत्खनन झाले होते. कोल्हापूर संस्थानचा पुरातत्व विभाग व डेक्कन कॉलेज पुणे यांच्यावतीने हे उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळी सापडलेल्या विविध ऐतिहासिक वस्तू जतन करण्यासाठी आणि हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच कोल्हापूर वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली होती. Shahu Maharaj :शाहू महाराजांचा कोल्हापुरातील वारसा, पाहा कधी न पाहिलेले PHOTOS कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब शासकीय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अटी आणि शर्थींसह नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयाच्या म्हणजेच नॅशनल म्युझियमच्या समन्वयाने या वस्तु न्यूयॉर्क याठिकाणी प्रदर्शनासाठी पाठविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पुढे कोरियामध्ये हेच प्रदर्शन भरवले जाणार असल्यामुळे त्या ठिकाणी देखील या वस्तू पाठविल्या जाणार आहेत. दरम्यान प्रथम कोल्हापुरातील ऐतिहासिक ठेवा जगभर प्रदर्शनासाठी जात असल्यामुळे कोल्हापूरसाठी देखील ही एक अभिमानाची बाब ठरणार आहे.