कोल्हापूर, 14 जुलै : मागच्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. घाटमाथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात झालेल्या पावसाने ओढे, नाले, तुडूंब भरून वाहत आहेत. दरम्यान कालपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट देण्यात आला होता. आज हवामान खात्याकडून कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असला तरी पावसाचा जोर मात्र कायम राहिला आहे. पंचगंगा पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत असली तरी 36.11 इंच इतकी पातळी झाली आहे. (Kolhapur rain update)
पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असल्याने अवघ्या दोन फुटांवर इशारा पातळी राहिली आहे. तर 43 फूट धोका पातळी असल्याने पुढच्या 24 तासांता पावसाचा जोर असाच राहिला तर महापूर येण्याची शक्यता आहे. आज (दि.14) पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.
हे ही वाचा : Kolhapur Pavankhind : पावनखिंडवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना शिवभक्तांनी चांगलाच चोपला Video Viral
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पूर बाधित तालुक्यांची पाहणी केली आहे. यातील शिरोळ, हातकणंगले, तालुक्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी जिल्हाधिकारी यांच्याकडून करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान मागच्या 24 तासांत जिल्ह्यात दोन सार्वजनिक तर 29 खाजगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये तब्बल 17 लाख 34 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
2019 आणि 2021 च्या पुराचा अंदाज घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासन वेळीच सावध झाले आहे. मागच्या 10 दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यात NDRF ची दोन पथके आली होती. या पार्श्वभूमिवर NDRF ची दोन पथके तैणात करण्यात आले आहेत, शिरोळ तालुक्यात पुराचा धोका असल्याने शिरोळ तालुक्यात NDRF ची एक तुकडी तैणात करण्यात आली आहे तर कोल्हापूर शहरात एका तुकडीला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा : पुण्यात पावसाचा हाहाकार, 5 तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी, गड-किल्ल्यांवर पर्यटनास बंदी
मागच्या चार दिवसांच्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या इशारा पातळीच्या दिशेने वाहत आहेत. यामुळे सर्वच नद्या पात्राबाहेर गेल्याने गावांचा संर्पक तुटल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तब्बल 60 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाड्या वस्त्यांचा संपर्क पूर्णपणे बंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.