कोल्हापूर, 24 नोव्हेंबर : कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने चितेंची बाब होत चालली आहे. काल (दि.23) कोल्हापुरात कुख्यात गुंडाने मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह पोस्टर लावल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान ही घटना ताजी असतानाच कोल्हापूर शहराची ओळख असलेल्या राजारामपुरीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वधुवर सूचक केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कित्येक दिवसांपासून राजारामपुरी पोलीस स्टेशन परिसरातील राजारामपुरी येथे वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच छापा टाकत दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.
हे ही वाचा : मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत बीएमसी अधिकारी असल्याचे सांगत जबरी चोरी
मालक सुधीर दिगंबर वळंजुवाणी (वय 56, रा. राजारामपुरी 12 वी गल्ली) व एजंट प्रसाद संजय पाटील (25, रा. तिरपण, पन्हाळा) अशी संशयितांची नावे आहे. दोन पीडित महिलांची सुटका पोलिसांकडून करण्यात आली.
राजारामपुरी आठव्या गल्लीमध्ये सुधीर वळंजूवाणी याने सर्व जाती-धर्मांसाठी वधू-वर सूचक केंद्र सुरू केले होते. बेसमेंटमध्ये असणार्या या कार्यालयाच्या आडून तो गरीब व असहाय्य महिलांना पैशाच्या आमिषाने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होता.
याची माहिती मिळाल्याने पोलिस मुख्यालयाकडील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने राजारामपुरी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून दोघा संशयितांना पकडले. तसेच पीडित महिलांची सुटका केली.
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातही गंभीर प्रकार
मागच्या दोन दिवसांपूर्वी शिवाजी विद्यापीठाचा 60 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे विद्यापीठाची सिनेट निवडणूकही चुरशीने पार पडली. या दरम्यान विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : ''आ बैल मुझे मार'' तरुणाचा मुर्खपणा पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल... Video Viral
शिवाजी विद्यापीठाचे बोधचिन्ह तसेच परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या लेटरहेडचा गैरवापर केल्याबद्दल राजारामपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला. परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अजितसिंह नारायणराव जाधव (वय 52) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी लक्ष घातले आहे. दरम्यान हे प्रकरण गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Kolhapur, Sex racket