साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 23 फेब्रुवारी : सध्या सगळीकडे आपल्याला प्लास्टिक आणि त्याच्या बंदिबद्दल बोलणारे लोक दिसत असतात. पण त्याच्यावर विचार करून काही उपाय शोधणारी माणसं क्वचितच आढळतात. मात्र, अशाच एका पर्यावरणप्रेमी सैनिकाने या टाकाऊ प्लास्टिकवर उपाय शोधला आहे. त्याने प्लास्टिक पासून विविध वस्तू लगोलग बनवणारी मशीन निर्माण केली आहे. सांगलीच्या तासगाव येथे राहणारे सचिन देशमुख यांनी एक मशीन विकसित केली आहे. सचिन हे पेशाने सैनिक आहेत. खरतर रोज लाखो टन टाकाऊ प्लास्टिकची भर कचऱ्यात पडत जाते. तेवढ्या मोठ्या प्रमाणात आणि जलद गतीने त्याची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळेच देशमुख पती-पत्नी यांनी यावर अभ्यास करून उपाय शोधून काढला. त्यांनी टाकाऊ प्लास्टिक पासून विविध वस्तू लगोलग बनवणारी मशीन निर्माण केली आहे. ऑटोमॅटिक, सेमी ऑटोमॅटिक आणि मॅन्युअली चालवले जाणारे अशी वेगवेगळी तीन मशिन्स त्यांनी बनवली आहेत. तर या मशिनचे जून 2022 मध्ये पेटंट देखील देशमुख यांच्या नावे झाले आहे. तर या मशीनचे प्रोडक्शन देखील सध्या सुरू झाले आहे.
कसे काम करते हे मशीन? हे मशीन सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या, घरगुती वापरातल्या पण टाकाऊ अशा प्लॅस्टिकच्या कचऱ्यासाठी बनवले आहे. गोळा केलेल्या प्लास्टिक वर काहीही प्रक्रिया न करता फक्त ते या मशीन मध्ये टाकायचे. या मशीन मध्ये त्या प्लॅस्टिकचा अर्ध-द्रव स्वरुप दिले जाते. मग तो घटक बाहेर एका साच्यातून घालून काढला की आपल्याला अंतिम वस्तू हातात मिळते. याच प्रमाणेच ऑटोमॅटिक, सेमी ऑटोमॅटिक मशीन काम करतात, अशी माहिती सचिन यांनी दिली. सध्या बाजारात प्लॅस्टिक रिसायकलबाबत जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यात काही ना काही तांत्रिक वा आर्थिक मर्यादा आहेत. पण सध्याचे हे मशीन आपल्या गरजेनुसार आपण वापरू शकतो. सरकारने प्लास्टिक बंदी घालून देखील काही प्लास्टिक खाद्य पदार्थांच्या पॅकेट्सना बंदी नाही, अशा गोष्टींमुळे पर्यावरणाला होणारी हानी थांबवणे हाच यामागे उद्देश आहे.
मंदिरात नारळ फोडल्यानंतर वाया जाणार नाही पाणी! पाहा लय भारी आयडिया, Video
किती येतो खर्च ? एका मशीनद्वारे सर्व प्रकारचे खाद्य पदार्थांचे रॅपर, पिशव्या, कप वेगैरेंवर प्रक्रिया करू शकतो. या मशीनमध्ये 1 किलो प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी जवळपास 25 ते 30 रुपयांचा खर्च येतो. त्यातून तयार झालेल्या मटेरियल पासून पेव्हिंग ब्लॉक, रोड माईलस्टोन दगड, विटा अशा अनेक गोष्टी बनवू शकतो. टाकाऊ प्लॅस्टिकचा बांधला बंधारा प्लास्टिकचे सरासरी वजन हे प्रक्रियेनंतर भरपूर कमी होते. पण त्याची ताकत वाढते. यावरच आधारित आम्ही वेगवेगळे प्रयत्न या निमित्ताने करत गेलो. 2016 साली ही प्लास्टिक प्रक्रिया करून पुनर्वापर संकल्पना आम्ही हळू हळू वाढवत गेलो. त्यातूनच 2019 साली आम्ही जगातील पहिला प्लास्टिक वापरून बनवलेला बंधारा तयार केला. या बंधऱ्यासाठी पुराच्या पाण्यातून वाहून आलेले प्लास्टिक, रोजच्या कचऱ्यातील प्लास्टिक असे सगळे वापरले. या बंधाऱ्यासाठी एकूण साडे सतरा टन प्लॅस्टिकचा वापर केला. यावेळी सर्व काळजी घेऊन तयार केलेला हा बंधारा सुरक्षितरित्या कार्यान्वित झालेला आहे, अशी माहिती देखील सचिन यांनी दिली आहे. टाकाऊ प्लॅस्टिकची विल्हेवाट ही एक जागतिक समस्या बनली आहे. असे असतानाही अशा प्रकारे केलेले प्रयत्न हे चांगल्या पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल नक्कीच ठरत आहे.