साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 8 फेब्रुवारी : आपण बऱ्याच वेळा मंदिरात जाताना देवाला अर्पण करण्यासाठी नारळ आणि फुलांचे ताट घेऊनच जात असतो. आणलेला नारळ मंदिराच्या बाहेर वाढवतो/फोडतो. यावेळी बऱ्याच वेळा त्या नारळाचे पाणी वाया जाते. नाराळाचं पाणी वाया जाऊ नये, त्याचा योग्य कामासाठी उपयोग व्हावा यासाठी कोल्हापूरच्या प्राध्यापकानं उपाय शोधला आहे.
कशी सुचली कल्पना?
कोणत्याही मंदिरात, जत्रेत भाविक नारळ वाढवतात. यावेळी त्या नारळात असणाऱ्या पाण्याबद्दल जास्त कोणी विचार करत नाही. नारळ फोडतच काही क्षणातच हे मौल्यवान नारळ पाणी वाया जाते. गेली दीड दोन महिने मंदिरात हे सगळे दृश्य पाहून कोल्हापुरातील दत्ता सुतार या प्राध्यापकांनी यावर विचार करायला सुरुवात केली होती.
सुतार हे कोल्हापूरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये 1993 पासून कार्यरत आहेत. नारळ पाण्याबद्दल त्यांनी केलेलं निरिक्षण हे सहकाऱ्यांना सांगितलं. त्यावर चर्चा केल्यानंतर त्यांनी नारळपाणी संकलन मशीन बनवलं.
75 वर्षांच्या कॅन्सरग्रस्त आजोबांचे अफाट संशोधन, पाणी आणि पेट्रोलवर चालणार गाडी Video
कसे आहे मशीन ?
कोणत्याही ठिकाणी ठेवता येऊ शकेल असे हे साधारणतः 2 फूट उंचीचे मशीन आहे. वरच्या बाजूला नारळ वाढवण्यासाठी एक स्टीलचे बफिंग केलेला अँगल बसवण्यात आलेला आहे. त्याखाली एक ट्रे बसलवला आहे, ज्यामध्ये फोडलेल्या नारळाचे पाणी एकत्र संकलित होईल. या ट्रेला चारही कोपऱ्यांना होल करून त्यातून हे पाणी खाली ठेवण्यात आलेल्या बाटलीमध्ये साठवले जाते.
हे नारळपाणी संकलन यंत्र सुतार यांनी एक प्राथमिक स्वरूपातील यंत्र म्हणून बनवले आहे. या यंत्राला बनवण्यासाठी 5 हजार रूपये खर्च आला आहे. या मशिनच्या संकल्पनेचा वापर करून गरजवंतांसाठी उपकरणाची निर्मिती करता येऊ शकते, त्यामुळे याचे पेटंट घेतले नसल्याचं सुतार यांनी स्पष्ट केलं.
नारळपाणी संकलित करण्याची गरज का?
'नारळ पाण्यात 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण असते. कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम असे अनेक घटक या नारळ पाण्यातून शरीराला मिळत असतात. तहान भागविण्यासोबतच, रुग्णांची शारीरिक ताकद वाढवणे, शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवणे, वजन कमी करणे अशा अनेक फायद्यांसाठी नारळ पाणी अत्यंत गुणकारी ठरत असते. त्यामुळे हे मौल्यवान पाणी वाया जाऊ देऊ नये,' असे सुतार यांनी सांगितलं.
हे नारळ पाणी संकलन यंत्र मंदिरात वापरले गेले तर या यंत्रामुळे नवीन बदल घडण्यास मदत होईल. परिसरातील स्वच्छतेबरोबरच मौल्यवान पाणी वाया न गेल्यामुळे मनाला धार्मिक समाधानही लाभेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.