साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 13 जून : आपल्या पाल्याला शाळेत पाठवून पाठ्यपुस्तकी ज्ञान देण्याऐवजी घरातच आपल्याच नजरेसमोर त्याचे दैनंदिन जीवनातील अनुभव आणि ज्ञान वाढवणे, अशा गोष्टी सध्या होम स्कूलिंगच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळत आहेत. परदेशानंतर आता भारतातही अशा प्रकारचे होम स्कूलिंगचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कोल्हापुरात गेल्या जवळपास पंधरा वर्षांपूर्वी होम स्कूलिंगचे संकल्पना राबवणाऱ्या नीलिमा देशपांडे यांच्याकडून या होम स्कूल विषयी अधिक माहिती दिली आहे. काय आहे होम स्कुलिंगची संकल्पना ? नीलिमा यांनी त्यांच्या मुलीचे पहिली ते दहावी पर्यंतचे सर्व शिक्षण होम स्कूलच्या माध्यमातून पूर्ण केले आहे. नीलिमा यांची मुलगी जान्हवी सध्या मुंबईमधील एका कॉलेजमध्ये बॅचलर डिग्रीच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. आपल्या पाल्याला घरच्या घरीच मुक्त पद्धतीने शिक्षण देणे, ज्यामध्ये ना ठराविक अभ्यासक्रम असतो, ना काही ठराविक पुस्तके वापरली जातात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींचा सखोल विचार आपल्या पाल्याला करायला लावून त्याच्यातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करणे अर्थात होम स्कूलिंग, असा साधारणपणे याचा अर्थ होतो. सध्या अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.
होमस्कुलिंग मध्ये शिकवण्याचे का ठरवले? जान्हवीला एक होम स्कुलर म्हणून शिक्षण देण्याचा आम्ही ठरवलं,तेव्हा सर्व बाजूंनी त्याचा विचार केला होता. मुळात मी स्वतः एक युपीएससीची विद्यार्थी होते, त्यामुळे मला माझ्या मुलीला फक्त पोपटपंची करुन मार्कांच्या मागे धावायला लावायचे नव्हते, असे नीलिमा यांनी सांगितले. याच कारणामुळे चक्क शाळेलाच उपाय शोधण्याचा धाडसी निर्णय पंधरा वर्षांपूर्वी घेतला होता. कशी निदर्शनास आली ही संकल्पना? आपल्या मुलीला तिला जगण्यात उपयोगी पडेल असे शिक्षण मिळवून देण्याचे मी ठरवले होते. त्यामुळे परदेशात एकदा फिरायला गेल्यावर तिथल्या शिक्षण पद्धतीचा मी बारकाईने अभ्यास करायचे. परदेशात राबवल्या जाणाऱ्या होम स्कूलिंग संकल्पने बद्दल मला समजले होते. अर्थातच त्या ठिकाणचे होम स्कूलिंग आणि भारतातील होम स्कूलिंग यामध्ये खूप मोठा फरक असल्याचे देखील दिसून आले. त्यामुळेच या नव्या शिक्षण पद्धतीतून शिक्षण देण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने जान्हवीला होम स्कूलिंग संकल्पनेतून शिक्षण दिले, असे नीलिमा यांनी सांगितले.
पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घ्यायचाय? तो सुद्धा कमी फीमध्ये? अशी आहे प्रवेश प्रकिया Video
होम स्कुलिंगमध्ये नेमकं काय केलं? होम स्कूलिंगच्या परदेशातील संकल्पनेला देशपांडे कुटुंबीयांनी आपल्या भारतातील परिस्थिती जुळवून ती त्यांच्या पध्दतीने राबवली आहे. पहिलीपासून सर्व शिक्षण घरीच देऊन शेवटी दहावीच्या परीक्षेसाठी जान्हवीला त्यांनी मदत केली. दहावीच्या परीक्षेसाठी 17 नंबर फॉर्मच्या माध्यमातून जान्हवीने परीक्षा दिली आहे. जान्हवीचे होमस्कूलिंग करताना ती पहिली ते दहावीमध्ये कधीही शाळेत गेली नाही. तसेच तिच्यासाठी कोणताही विशिष्ट ठराविक असा अभ्यासक्रमही आम्ही डोळ्यासमोर ठेवला नव्हता. पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी जान्हवीला पाचवी आणि दहावीची परीक्षा द्यावी लागली. एसएससी बोर्डाच्या नियमानुसार जान्हवीने थेट पाचवीची आणि पुढे 17 नंबर फॉर्म भरून दहावीची परीक्षा देखील एका जिल्हा परिषद शाळेतून दिली आहे. बोर्डाने तिच्यासाठी एक शाळा ठरवून दिली होती. जिथे तिची एक शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून प्रात्यक्षिक परीक्षा देखील घेण्यात आली होती. कसे केले नियोजन? आपापले काम सांभाळून आपल्या पाल्याची शिक्षणाची जबाबदारी उचलणे हे खूप मोठे आव्हानच ठरते. यावर उपाय म्हणून जान्हवीच्या आईने आणि मी आपापल्या कामाचे नियोजन एकमेकांच्या समन्वयाने लावून घेतले. जेणेकरून कोणी एकजण नेहमी घरी जान्हवीच्या बरोबर थांबून तिचा अभ्यास घेऊ शकेल. दरम्यान जान्हवीचे होमस्कूलिंग सुरू असताना ज्या विषयांचा अभ्यास आम्ही घेऊ शकत होतो, ते आम्ही तिला शिकवले. मात्र ज्याचा अभ्यास आम्ही घेऊ शकत नव्हतो, त्याचा आम्ही तेवढ्या पुरता रितसरनक्लास लावला होता. दहावीच्या परीक्षा वेळी देखील पेपर मधील विषय आणि पेपर लिहिण्याची पद्धत यासाठी देखील आम्ही तिला सरावाचे पेपर सोडवायला लावले होते, असे जान्हवीचे वडील यांनी सांगितले आहे. यामध्ये आम्ही जानवीला आमच्या कामाच्या मिटींगवेळी देखील आमच्या सोबत घेऊन जायचो, जेणेकरून तिला अशा गोष्टींची अजून जवळून आणि चांगल्या पद्धतीने ओळख होईल, असेही ते म्हणाले.
होमस्कूलर म्हणून शिकताना काय वाटते? पहिली ते दहावीचे होम स्कुलिंग पूर्ण करणाऱ्या जान्हवीला आपल्यात आणि दहावीपर्यंत नेहमीच्या पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त फरक जाणवत नाही. जेव्हा शाळा बंद करून घरी होमस्कूलिंग सुरु केले, तेव्हा सुरुवातीचे काही दिवस मजा-मस्ती, दंगा करण्यात गेले. पण नंतर त्याचा कंटाळा येऊन मीच माझ्या मनाने बाजारातून आईला पुस्तक आणायला सांगितली होती. मात्र मला जेव्हा हवे तेव्हा एखादी गोष्ट करता यायची, त्यामुळेच मला मनापासून होम स्कुलिंग आवडायला लागले होते. मित्र-मैत्रिणी वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी आपला स्वभाव देखील महत्त्वाचा ठरतो हेही मी याकाळात शिकले, असे मत जान्हवीने व्यक्त केले आहे. दरम्यान होमस्कूलिंग म्हणजे शाळा सोडून घरी राहणे, एवढेच होत नसून घरातून व्यवस्थितरित्या शिक्षण घेणे गरजेचे असते. ज्यांना हे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी देखील शाळेचे आणि मुलांच्या झोपेचे काही तास सोडले तर बाकीच्या वेळी मुले ही आपल्या जवळच असतात. त्यावेळी आपण त्यांना योग्य ते सर्व शिकवू शकतो असेही नीलिमा देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.