नागपूर, 17 जून : राजकारणात पक्षांतर हा आता नित्याचाच विषय झाला आहे. अनेकदा एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याला ऑफर दिली जाते तेव्हा चर्चेचा विषय होतो. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही त्यांच्या आयुष्यातील असाच एक किस्सा सांगितला आहे. गडकरी म्हणाले की, एका नेत्याने मला एकदा काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता, त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले होते की, मी त्या पक्षाचा सदस्य होण्याऐवजी विहिरीत उडी घेईन. काँग्रेसच्या 60 वर्षांच्या कारकिर्दीत झालेल्या कामाच्या तुलनेत भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षांत देशात दुप्पट काम केल्याचा दावा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांनी यावेळी केला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी भंडारा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित मेळाव्याला संबोधित केले. भाजपमधील त्यांचे सुरुवातीचे दिवस आणि पक्ष आता काय करत आहे, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकर यांनी त्यांना एकदा दिलेला सल्लाही त्यांना आठवला. ..पण, काँग्रेसमध्ये जाणार नाही : गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘श्रीकांत जिचकार मला एकदा म्हणाले होते - ‘तुम्ही पक्षाचे खूप चांगले कार्यकर्ते आणि नेते आहात. तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केलात तर तुमचे भविष्य उज्ज्वल असेल’, पण मी त्यांना सांगितले की, काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा मी विहिरीत उडी घेईन, कारण माझा भाजपवर आणि त्यांच्या विचारसरणीवर दृढ विश्वास आहे आणि मी त्यासाठी काम करत राहीन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदसाठी (ABVP) काम करताना लहान वयात त्यांच्यात मूल्ये रुजवल्याबद्दल गडकरींनी संघाचे कौतुक केले. वाचा - रावसाहेब दानवे पुन्हा चर्चेत, नव्या वक्तव्यानं वाद; म्हणाले आम्ही त्यांना पैसे… काँग्रेसबद्दल मंत्री म्हणाले की, पक्ष स्थापनेपासून अनेक वेळा विभागला गेला आहे. ते म्हणाले, ‘आपल्या देशाच्या लोकशाहीचा इतिहास विसरता कामा नये. भविष्यासाठी आपण भूतकाळातून शिकले पाहिजे. काँग्रेसने आपल्या 60 वर्षांच्या सत्ताकाळात ‘गरीबी हटाओ’चा नारा दिला, पण आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी अनेक शैक्षणिक संस्था उघडल्या.’’ भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनाबद्दल नितीन गडकरींनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले की, देशाचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. गडकरी म्हणाले, “काँग्रेसने आपल्या 60 वर्षांच्या कारकिर्दीत जितके काम केले नाही त्यापेक्षा भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षांत दुप्पट काम केले आहे.” काही दिवसांपूर्वी गडकरी उत्तर प्रदेशमध्ये होते, तेव्हा त्यांनी लोकांना सांगितले होते की 2024 च्या अखेरीस उत्तर प्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.