कोल्हापूर, 27 जून : भारतात शतकानुशतके चालत आलेल्या बालविवाहाच्या प्रथेमुळे कितीतरी मुलींचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडले. याबाबतीत कायदे झाले, जन जागृती होत आहे तरी देखील आजही देशातील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या सरकारसोबत कित्येक सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशीच एक संस्था सध्या कोल्हापुरात काम करत आहे. बालविवाह विरोधी जागर प्रकल्पामुळे गेल्या दोन वर्षात कोल्हापूर जिल्हा आणि परिसरातील तब्बल दीडशे बालविवाह रोखण्यात अवनी या सामाजिक संस्थेला यश आले आहे. अवनीचा जागर प्रकल्प अवनी ही कोल्हापुरातील संस्था बालविवाह होऊच नये, यासाठी तिच्या जागर प्रकल्पातून प्रयत्न करते. मात्र बऱ्याचदा ग्रामीण भागातून असे विवाह झाल्यानंतरच माहिती समोर येत असते. त्यानंतर अशा विवाह बंधनात अडकलेल्या मुलींची सुटका करण्याचे काम देखील ही संस्था करते. या बालविवाह विरोधी कारवाईत बालकल्याण समिती या संस्थेला मदत करते, असे अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी सांगितले.
अभिताभ बच्चन यांची देणगी अवनी संस्थेला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आर्थिक सहाय्य करत संस्थेच्या जागर प्रकल्पाला पाठिंबा दिला. त्यामुळेच गेल्या वर्षभरात अवनी मार्फत 47 बाल विवाह रोखले आहेत. याशिवाय 150 बालविवाह होण्याआधी थांबवले आहेत. यातील बरेचशी बालविवाह प्रकरणे ही ग्रामीण भागात घडली आहेत, असे भोसले यांनी स्पष्ट केले. विवाह कधी ठरतो बेकायदेशीर? सध्या विवाहाची वयोमर्यादा ही मुलांसाठी 21 वर्षे आणि मुलींसाठी 18 वर्षे आहे. मात्र त्या आधी जर कोणाचा विवाह होत असेल, तर तो बालविवाह म्हणून गणला जाऊन तो बेकायदेशीर ठरतो. यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाते. ‘प्लीज मला इथून घेऊन जा’ मुलीच्या इन्स्टा पोस्टने धक्कादायक घटना उघड असा रोखला जातो बालविवाह गाव पातळीवर जाऊन संस्थेच्या सदस्य हे बालविवाहांबाबतीत जन जागृती करत असतात. त्यातूनच त्यांना गावात होणाऱ्या बालविवाहाची माहिती मिळत असते. फोनवरून माहिती मिळाल्यानंतर तातडीने तिथे जाऊन हे बालविवाह रोखले आहेत. कोल्हापूर जिल्हा बालकल्याण समिती, महिला बालकल्याण विभाग आणि अवनी संस्था एकत्रितरित्या काम करत हे विवाह थांबवले जातात. त्या मुला-मुलींचे समुपदेशन केले आहे. त्यानंतर बालकल्याण समितीसमोर त्यांना हजर केल्यामुळे हे बालविवाह रोखण्यात यश मिळत असल्याचेही अनुराधा भोसले सांगतात. बालकल्याण समिती ही त्या मुलां-मुलींकडून वयोमर्यादा पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नसल्याचे लिहून घेते. त्यामुळे यातील बऱ्याचशा मुली या पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. तर त्यांच्यामुळे समाजात देखील मुलीने विवाहास योग्य वय पूर्ण होऊ पर्यंत शिकले पाहिजे, असा एक चांगला संदेश दिला जात आहे. भांडी धुणारा कामगार झाला समाज शिक्षक, खुशाल ढाकचा प्रेरणादायी प्रवास आता आम्ही शिकणार, मुलींच्या प्रतिक्रिया सध्या ग्रामीण भागात गरिबी, निरक्षरता, पितृसत्ता यासारखे घटक बालविवाहामागील कारणे ठरत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुली मात्र भरडल्या जातात. बऱ्याचदा त्यांना हा विवाह मंजूर नसतो. पण त्यावेळी त्यांच्यापुढे दुसरा काही पर्यायही उपलब्ध नसतो. “मला अजून 2 बहिणी असल्याने आई-वडिलांना माझ्या भविष्याची काळजी सतावत होती. त्यात माझ्यासह बाकीच्या बहिणीचा खर्चही पेलणारा नव्हता. त्यामुळेच आमच्या पाहुण्यातच चांगले स्थळ पाहून विवाह ठरवला होता. पण आता मला माझी आवड असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात माझे नाव कमवायचे आहे”, अशा शब्दांत जानकी (नाव बदललेले आहे)ने आपल्या भावना व्यक्त केल्या. “माझ्या घरी मला आई नसल्याने माझ्या वडिलांना माझी चिंता वाटायची. त्यामुळे मी नववीत असतानाच माझा विवाह ठरला. मात्र तो विवाह थांबवल्यानंतर मी शिक्षणाकडे लक्ष देऊ लागले. मला दहावीला 60 टक्के मार्क मिळाले असून पुढे मला शिक्षक होण्याची इच्छा आहे”, असे कुसुमती(नाव बदललेले आहे)ने सांगितले आहे. “काही वैयक्तिक कारणामुळे माझा विवाह ठरला होता, जो मला करायचा नव्हता. पण परिस्थितीमुळे मला तो करावा लागणार होता. अशात अवनी संस्थेमुळे तो विवाह थांबविला आणि मला पुन्हा शिकण्याची एक संधी मिळाली आहे. त्यामुळे मी दहावीत चांगले गुणही मिळवले आहेत. पुढे मला पोलीस भरतीसाठी उतरायचे आहे. त्यामुळे मी कॉलेज करतच पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात नाव नोंदवले आहे. तसेच पोलिस झाल्याशिवाय लग्नाचा विचारही न करण्याचा निर्धार मी मनाशी पक्का केला आहे”, असे आंचल (नाव बदललेले आहे)ने सांगितले. दरम्यान, या बालविवाहाच्या उदाहरणांवरून एकच गोष्ट लक्षात येते की, बऱ्याच वेळा मुलींना परिस्थीतीमुळे त्यांच्या मनाविरुद्ध जाऊनच असा विवाह करावा लागतो. मात्र त्यांना कुटुंबीयांची योग्य साथ मिळाली, तर त्याच मुली नक्कीच स्वतःचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील राहू शकतात.