बीड, 26 जून: सर मी….प्लीज मला वाचवा.. खूप त्रास दिलाय मला… प्लीज मला इथून घेऊन जावा…! अशी इन्स्टाग्राम पोस्ट पडली आणि बीडमधील ग्रामीण पोलीस खडबडून जागे झाले. बीड तालुक्यातील कुटेवाडीच्या 17 वर्षीय मुलीचा सक्तीने बालविवाह झाला होता. याप्रकरणी मुलीच्या पोस्टची दखल घेत बीड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलीची सुखरूप सुटका केली. तसेच आई-वडिलांसह 50 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमधील काटेवाडीच्या 17 वर्षीय मुलीचा जबरदस्तीने एका मुलाशी विवाह लावण्यात आला. माझं जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं, मला मारहाण देखील करून जीवे मारण्याची धमकी दिली. रोजच्या त्रासाला कंटाळून मुलीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. 17 जूनला ही पोस्ट आल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी 18 जूनला तात्काळ कारवाई करून मुलीची सुटका केली. तसेच तिच्या आई-वडिलांसह 50 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण? बीड तालुक्यातील कुटेवाडीच्या 17 वर्षीय मुलीचा पालवणच्या प्रदीप मस्केशी बालविवाह करण्यात आला. मुलीच्या इच्छेविरूद्ध 17 जून रोजी हा विवाहसोहळा झाला. संबंधित मुलीने माझी इच्छा नसताना घरच्यांनी सक्तीने विवाह लावून दिल्याची इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. याची दखल घेत 18 जून रोजी बीड ग्रामीण पोलिसांनी सदर मुलीची सुटका केली. त्यानंतर ग्रामसेवक दत्तात्रय लोमटे यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलिस ठाण्यात 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे इंस्टाग्रामच्या पोस्ट मध्ये? सर मी…. माझे काल जबरदस्ती लग्न केले. मला खूप मारलंय. नाही लग्न केलं तर मारुन टाकीन अशा धमक्या देऊन जबरदस्ती करुन माझे लग्न केलंय… प्लीज मला वाचवा… पालवण गावात मस्के सोबत लग्न केलंय माझं… मी तुम्हाला सांगितलं असं सांगू नका…. मला मारुन टाकतील…. मला इथून घेऊन जावा… प्लीज… मी कंप्लेंट करेन म्हणून मामांनी फोन जप्त केला. एकाच दिवसात लग्न केले… खूप त्रास दिलाय मला… प्लीज मला इथून घेऊन जावा…! साचलेल्या पाण्यात पाय ठेवताय? आधी ही बातमी वाचा, जीवही जाऊ शकतो! मुलीची रवानगी बालगृहात बालविवाह झालेल्या मुलीची बीड पोलिसांनी सुखरूप सुटका केली. तिला बालकल्याण समितीसमोर हजर केले. तेव्हा समितीने तिला काळजी व संरक्षणाची गरज असल्याचे स्पष्ट केले. मुलीला पालकांच्या ताब्यात न देता स्वत: ताब्यात घेऊन तिची रवानगी बालगृहात केली आहे. बालविवाह लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करीत आहेत. 50 जणांवर केली कारवाई बीड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अल्पवयीन मुलींचा विवाह झाला होता. त्यानंतर त्या मुलीने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली. बीड ग्रामीण पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई केलीय. आत्तापर्यंत 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलीचे आई-वडील, सासू-सासरे, मामा, वऱ्हाडी मंडळी यांचा यात समावेश आहे, असे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.