कोल्हापूर, 24 फेब्रुवारी : कणेरी मठातील देशी गाईंना शिळे अन्न दिल्यानं ५० हून अधिक गाईंचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालीय. याशिवाय ३० हून अधिक गाईंची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. गाईंवर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दरम्यान, याचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. कणेरी मठातील स्वयंसेवकांनी चित्रीकरण करण्यास नकार देत वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनीधींना मारहाण केली. गाईंच्या मृत्यूची घटना लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आता होत आहे. तसंच कणेरी मठाच्या प्रशासनाकडूनही नेमक्या किती गाई मृत्यूमुखी पडल्या याची माहिती देण्यात आलेली नाही. कणेरी मठात पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. यामध्ये लोकोत्सव प्रदर्शनही असून यासाठी येणाऱ्या नागरिकांना जेवण देण्यात येते. यात शिल्लक राहिलेलं जेवण गाईंना खाऊ घालण्यात आले. यामुळे गाईंचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं जात आहे. या सर्व प्रकाराचे वार्तांकन कऱण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी मठात गेले होते. तेव्हा मठातील स्वयंसेवकांकडून माध्यम प्रतिनिधींना अडवून मारहाण केली गेली. मारहाण झालेल्या माध्यम प्रतिनिधीचे नाव भूषण पाटील असं आहे. कोल्हापुरातील कणेरी मठावर कार्यक्रमातील शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायींचा मृत्यू भूषण पाटील यांच्यासह इतर माध्यम प्रतिनिधीही होते त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार कणेरी मठ परिसरात झाला. याप्रकरणी कोल्हापूर प्रेस क्लबसह पत्रकार संघटनेकडून निषेध व्यक्त केला गेला. तसंच गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कणेरी मठात पंचमहाभूत लोकोत्सवासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले गेले. राज्यपालांसह अनेक दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावलीय. या लोकोत्सवात मोठ्या प्रमाणावर लोक येतील अशी अपेक्षा होती. मात्र कमी लोक आल्याने मोठ्या प्रमाणावर जेवण वाया जात आहे. यातलेच शिळे अन्न जनावरांना खायला घातल्यानं हा प्रकार घडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.