कोल्हापूर, 29 डिसेंबर : बॉलिवूडची ब्लॅक लेडी अर्थात फिल्म फेअरची ट्रॉफी बरोबर आपले नाव जोडले जावे, अशी चित्रपट सृष्टीतील प्रत्येकाचीच एक इच्छा असते. कोल्हापूरच्या एका दिग्दर्शकाने तर गेल्या 3 वर्षात चक्क 2 वेळा आपले नाव फिल्म फेअरच्या यादीत नोंदवले आहे. नुकताच या दिग्दर्शकाला फिल्म फेअर पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. सचिन सूर्यवंशी असे या तरुण दिग्दर्शकाचे नाव आहे. त्यांनी मर्दानी खेळ या विषयावर ‘वारसा’ माहितीपट बनवला होता. या महितीपटाला 2022 सालातील फिल्मफेअर पुरस्कार नुकताच मिळाला आहे. वारसा माहितीपटाला नॉन फिक्शन श्रेणीत बेस्ट फिल्म पुरस्कार मिळाला आहे. या डॉक्युमेंट्री फिल्मसाठी सलग दोन वर्षे त्यांच्या टीमने रिसर्च व शूटिंगचे काम केल्याचे सचिन सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. तर 2019 साली सचिन सूर्यवंशी यांच्याच ‘सॉकर सिटी’ या फुटबॉलवरील माहितीपटाला देखील फिल्मफेअर मिळाला होता. त्यामुळे कोल्हापूरच्या सुपुत्राने तीन वर्षात दोनवेळा फिल्मफेअर मिळवल्याने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काय आहे वारसा? कोल्हापुरात मर्दानी खेळाचे आखाडे अजूनही तग धरून आहेत. मर्दानी खेळाडू आणि त्यांना घडविणारी वस्ताद मंडळी केवळ शिवरायांवरील प्रेमापोटीच स्वतःच्या खिशाला झळ लावून हा खेळ जपत आहेत. मर्दानी खेळ ही एक शिवकालीन युद्धकला. या युद्धकलेच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला. शिवरायांचे मावळे मर्दानी खेळात अत्यंत निपुण होते. हा युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक कशा प्रकारे प्रयत्न करत आहेत, हे या माहितीपटात दाखवण्यात आले आहे. वस्तादांच्या, खेळाडूंच्या मुलाखती, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असे या पंचवीस मिनिटांच्या माहितीपटाचे स्वरूप असल्याचे सचिन यांनी स्पष्ट केले.
कसा तयार झाला माहितीपट ? सचिन मागील काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. पडद्यावर भव्य दिव्य स्वरूपात दिसणाऱ्या माहितीपट तयार करण्यासाठी त्यांना तब्बल तीस लाख इतका खर्च झाला आहे. हा माहितीपट बनवताना सचिन यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरी माघार न घेता स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा माहितीपट पूर्ण केला. सचिन यांना दिग्दर्शनाची आवड ही निरिक्षणातून लागली. काहितिरी मिळविण्यापेक्षा काहीतरी मांडायला पाहिजे. आपल्या शेजारी एवढ्या समस्या आहेत. त्या आपण सर्वांसमोर मांडायला पाहिजेत आणि त्या लोकांपर्यंत नीट पोहोचायला पाहिजे, यामुळे मी खरंतर या क्षेत्रात आलो आहे. Kolhapur : नवीन वर्षाच्या स्वागतावेळी गडबड नको, अन्यथा पोलिसांकडून मिळेल प्रसाद! ‘छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धकला जपणारे अनेक जण आहेत. त्यातही बरेचजण स्वखर्चाने देखील ही कला जपत आहेत. त्यांनी जपलेला हा वारसा फार महत्त्वाचा आहे. सध्या बऱ्याचदा आपल्या मुलांना परदेशी खेळ खेळायला लावून आपल्याच मर्दानी खेळांना आपण किंमत देत नाहीय. त्यामुळे हे आपण मांडायला पाहिजे, हाच मुख्य हेतू वारसा या माहितीपटाच्या मागे होता. पुढचा प्रोजेक्ट काय? सचिन सुर्यवंशी सध्या एका मोठ्या मराठी चित्रपटासाठी अभ्यास करत आहेत. कोल्हापुरातीलच शेतकरी मुलांच्या नेमक्या काय समस्या आहेत, त्यांच्या समोर सध्या काय प्रश्न आहेत, हे मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सचिन सुर्यवंशी यांनी सांगितले.