कोल्हापूर, 03 डिसेंबर : कोल्हापुरात सध्या अनेकानेक नवीन खाद्यपदार्थ मिळत आहेत. पण जुन्या स्पेशल कोल्हापुरी टॅग असलेल्या खाद्यपदार्थांची लोकप्रियता देखील तितकीच टिकून आहे. यापैकीच एक म्हणजे नितीन्स कॅन्टीनची खांडोळी. हा प्रकार तसा कोल्हापुरात बराच प्रसिद्ध आहे. पण कोल्हापूरच्या बाहेर देखील आता हा पदार्थ मिळू लागला आहे. चला तर मग या खांडोळी पदार्थाची सुरुवात कशी झाली होती जाणून घेऊया.
कशी झाली खांडोळीची सुरुवात?
कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी उद्यमनगर परीसरात असणाऱ्या नितीन्स कॅन्टीनने स्वतः सुरू केलेल्या खांडोळी या पदार्थाच्या चवीत आजपर्यंत जराही बदल केलेला नाही. त्यामुळे गेल्या 70 हून जास्त वर्षांपासून ते खवय्यांची सेवा करत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापूरच्या उरुणकर बंधूंनी ‘छाया’ हे नवीन हॉटेल सुरू केले होते. कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी अर्थात छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे हॉटेल होते. सध्या तेजस उरुणकर आणि नितीन उरुणकर हे बापलेक हा व्यवसाय सांभाळत आहेत. तेजस यांचे आजोबा शशिकांत उरुणकर यांनी खरंतर खांडोळी हा पदार्थ सर्वांसमोर आणला होता.
पोलंडहून जेव्हा परदेशी लोक कोल्हापुरात आले होते, तेव्हा आमचे आजोबा हे तिथे खानपान पुरवण्यासाठी गेले होते. भाजी-भाकरी हा त्या लोकांचा आहार नव्हे, हे लक्षात घेऊन आमच्या आजोबांनी ब्रेड आणि अंडी यांच्यापासून एक पदार्थ त्या लोकांसाठी बनवला होता. त्या लोकांना तो पदार्थ प्रचंड आवडला आणि अशा प्रकारे या खांडोळी पदार्थाची सुरुवात झाली. हळूहळू खांडोळीची चव कोल्हापुरात प्रसिद्ध झाली. खांडोळी या नवीन डिशला कोल्हापुरी खाद्यप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता तर केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील लोकही आमच्या हॉटेलला भेट देऊ लागले आहेत, असे तेजस उरुणकर यांनी सांगीतले.
अनेक ठिकाणी शाखा
छाया हॉटेलनंतर वेगवेगळ्या ठिकाणी भोजनालय स्वरूपात ग्राहकांना सेवा देण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार 1950 मध्ये राजारामियन क्लबमध्ये कॅन्टीन त्यानंतर 1994 मध्ये कोल्हापुरातील केडीसीसी बँकेत कॅन्टीन सुरू करण्यात आले. 2012 मध्ये छत्रपती शिवाजी उद्यम नगर येथे 'नितीन कॅन्टीन' सुरू केले. 2017 मध्ये ताराबाई पार्क येथे नवीन शाखा उघडण्यात आली आहे. तर सध्या इचलकरंजी, गडहिंग्लज, पुणे अशा ठिकाणी देखील आमच्या शाखा कार्यरत आहेत, असेही तेजस म्हणाले.
चहाच्या किंमतीत इथं मिळतोय आरोग्यदायी नाश्ता, पाहा Video
कशी बनवली जाते खांडोळी?
खांडोळी हा एक ग्रामीण शब्द आहे. खांडोळी करणे म्हणजे लहान लहान तुकडे करणे. ब्रेड आणि अंडे यांचे मिश्रण हाच खांडोळीतील महत्वाचा घटक. तव्यावर फेटून घेतलेले अंडे आणि ब्रेड एकत्र भाजून घेतल्यानंतर ब्रेड ऑम्लेट सारखे बनवून घेतले जाते. त्यानंतर प्लेटमध्ये यावर कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, कोथिंबीर, सॉस आदी घटक वरून टाकले जातात आणि याचे तुकडे करून हा पदार्थ खायला दिला जातो. सध्या खांडोळी सोबतच नितीन्स कॅन्टीनमध्ये 5 प्रकारच्या खांडोळी, वेगवेगळ्या प्रकारचे ऑम्लेट्स मिळतात. त्याचबरोबर शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पद्धतींचे विविध ब्रेड टोस्ट आणि सँडविच देखील मिळतात.
पत्ता :
खांडोळी नितीन्स कॅन्टीन छत्रपती शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Local18, Local18 food