कोल्हापूर, 01 फेब्रुवारी : कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ पुन्हा एकदा इडीच्या रडारवर आले आहेत. मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ईडीने आज (दि.01) छापे टाकले. बँकेच्या मूख्य कार्यालयासह सेनापती कापशी शाखेवर हे छापे पडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या बँकेवर छापे पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. तसेच सेनापती कापसी येथील जिल्हा बँकेच्या शाखेचीही तपासणी सुरु आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर कारखाना व मुलीच्या घरी ईडीने छापे टाकले होते. यानंतर पुन्हा एकदा ईडीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेत छापा मारत कारवाई केली आहे.
हे ही वाचा : पहाटेच्या थपथविधीमागे हात आहे का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ असल्याने कोणती कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मागच्या वेळी टाकलेल्या छाप्यात काय सापडले, याची माहीती समजू शकली नाही मात्र गेली वीस दिवस हे वादळ शांत झालेले नाही, याची चर्चा कागल मतदारसंघात सुरु होती.
हे ही वाचा : ठाकरे गट, वंचितच्या युतीवर पवारांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; राष्ट्रवादीची भूमिकाही केली स्पष्ट
बुधवारी सकाळी अकरा वाजता ईडीचे अधिकारी जिल्हा बँकेच्या शाहुपुरी मुख्यकार्यालयात पोहचले आहेत. त्यांनी तपासणी सुरु केली असून ईडीचे अधिकारी आल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा बँकेच्या आवारात जमा होऊ लागले आहेत.
आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कथित आरोपांममध्ये ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 15 वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात 50 कोटी कॅश भरले होते. ते पैसे साखर कारखान्याच्या खात्यात वळवले होते. तसेच कोलकात्यातील काही शेल कंपन्यांचा वापर करुन काळा पैसा आपल्या खात्यात वळल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणाची मागील सहा महिन्यांपासून आम्ही चौकशी करत होतो अशी माहिती ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. काही कंपन्यांची चौकशी ईडी करत आहे. त्या कंपन्यांचे कनेक्शन हसन मुश्रीफ आणि त्यांच्या संबंधित असलेल्या साखर कारखान्यांशी जोडलं जात आहे. रजत प्रायव्हेट लिमिटेड, माऊंट कॅपिटल लिमिटेड या दोन्ही कंपन्या बंद पडल्या आहेत.