कोल्हापूर, 30 डिसेंबर : राज्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यावेळी अनेक सुशिक्षित उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामधील काही जणांची तर थेट सरपंचपदी निवड झालीय. कोल्हापूर जिल्ह्यातही संदीप पोळ हा तरुण सरपंचपदी निवडून आला आहे. पुण्यातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून गावी परतलेल्या संदीप यांनी थेट सरपंचपदी झेप घेतली आहे.
आयटी कंपनीतील नोकरी सोडली कारण...
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील तळंदगे या गावाचे संदीप रहिवाशी आहेत. स्वत:चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पूणे गाठले. पुण्यातील आयटी कंपनीमध्ये त्यांनी चांगल्या पगारावर नोकरी केली. संदीपचे वडील सेवा अधिकारी म्हणून काम करत. त्यामुळे त्यांच्या रक्तामध्येच समाजसेवा होती. समाजसेवेचे निर्धार करत संदीपनं ही नोकरी सोडली.
संदीप यांनी आयटी क्षेत्रातील नोकरी सोडल्यानंतर राज्यशास्त्र विषयात एमए ची पदवी घेऊन या विषयात संशोधन सुरु केले. पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूट येथे पत्रकारितेचे शिक्षण, 'यूजीसी'च्या नेट परीक्षेत फेलोशिप, पुण्यात स. प. महाविद्यालयात शिक्षकाची नोकरी असा प्रवास त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर संदीप गावी परतले आणि त्यांनी गावातील प्रश्नांवर काम करण्यास सुरूवात केली.
कामं केली आणि पाठिंबा मिळवला
संदीप यांनी गावाच्या विकासासाठी मोठी मेहनत घेतली आहे. स्पर्धा परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासाचा वापर करुन गावासाठी त्यांनी गावातील वेगवेगळे प्रश्न मार्गी लावले. त्यांनी गावातील महिलांसाठीही अनेक चांगल्या गोष्टी केल्या. त्यामुळे महिला वर्गानंही त्यांना पाठिंबा दिला.
भाजी विक्रेत्यानं केलं दिग्गजांना चित, सरपंचपदी झाली निवड!
कोणतीही सत्ता हातामध्ये नसताना खडलेली गावची पाणी योजना, बससेवा, तळंदगे फाटा जगन्नाथ मंदिर रस्ता दुरुस्ती, धोबी कट्टा, सार्वजनिक शौचालय सुविधा, पाणी प्रदूषण, पंचगंगा नदी प्रदूषण यासारखे कित्येक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
या सर्व कामांचा सकारात्मक परिणाम संदीप यांच्या विजयात झाला. संदीप यांनी ताराराणी आघाडीकडून सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता.यावेळी झालेल्या तिरंगी निवडणुकीत त्यांनी तब्बल 240 मतांनी विजय मिळवला. आता सरपंचपदाच्या कारकिर्दीत गावाच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचं संदीप यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat, Kolhapur, Local18