कोल्हापूर, 25 ऑक्टोबर : मागच्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या दिवाळी सणाला यंदा मोठा उत्साह दिसून येत आहे. मागची दोन वर्षे कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने दिवाळीत देवदेवतांचे दर्शन घेता न आल्याने यंदा भाविकांनी मात्र सगळीकडेच गर्दी केली आहे. दरम्यान साडेतीन शक्तीपिठातील एक मानली जाणाऱ्या अंबाबाई मंदिरात यंदा दिवाळीनिमीत्त काकडा प्रज्वलित करण्याच्या विधीला आज पहाटेपासून प्रारंभ झाला.
तुपात भिजवलेली पेटती मोठी ज्योत (काकडा) मंदिराच्या शिखराच्या टोकावर ठेवण्याचा हा विधी असून हा पेटता काकडा हातात घेऊन मंदिराच्या शिखरावर चढवला जातो. हा विधी त्रिपुरारी पौर्णिमपर्यंत चालू राहणार असून तो पाहण्यासाठी पहाटे दोनपासूनच मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे.
हे ही वाचा : Diwali 2022 : भाऊबीजेला द्या बुद्धीला चालना देणारे गिफ्ट, VIDEO
अंबाबाई मंदिराची ही परंपरा मागच्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. लक्ष्मीपुजनानंतरच्या पहाटे या काकडा विधीला मुख्यत्वे सुरूवात होते. यानंतर पुढचे 15 म्हणजे कार्तीक पोर्णिमेपर्यंत हा विधी रोज होत असतो. हा काकडा पहाटो दोनच्या दरम्यान मंदिराच्या शिखरावर चढवला जातो यावेळीपासून मंदिर भांविकांसाठी खुले करण्यात येते. आज पहाटे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, रोषणनाईक निवास चव्हाण, खजिनदार महेश खांडेकर, मंदार मुनीश्वर, ऐश्वर्या मुनीश्वर, प्रसाद लाटकर, संजय जाधव, संतोष खोबरे यांच्या उपस्थितीत विधी झाला. मंदिराचे शिखर साधारणपणे चाळीस फूट उंच आहे.
एवढ्या उंच शिखरावर केवळ शिखराच्या दगडी टप्प्यांचा आधार घेत चढावे लागते. एका हातात पेटता काकडा व दुसऱ्या हाताने दगडी टप्प्याला धरत शिखरावर एका दमात पोहोचावे लागते. पहाटे मंदिराच्या शिखरावर काकडा चढवताना थंडीचे आगमन आलेले असते. किंबहुना हिवाळा ऋतूची या विधीपासूनच सुरुवात होते. त्यामुळे काकडा चढवण्यासाठीचे कौशल्य महत्त्वाचे मानले जाते.
मंदिरात भाविकांची गर्दी
कोल्हापूरची अंबाबाई ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक दैवत आहे. माहुर, कोल्हापूर, तुळजापूर आणि वणी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठं आहेत. नवरात्र उत्सवावेळी अंबाबाईची 9 दिवस वेगवेगवेळ्या रूपांमध्ये पूजा बांधली जाते. त्यामुळे देवीचं रूप आणखी खुलून आणि अधिक मनोहरी दिसतं. यावेळी कोरोनानंतरची यंदाची दिवाळी ही निर्बंध मुक्त साजरी होत आहे. त्यामुळे मंदिरात गर्दी बघायला मिळाली.
हे ही वाचा : अंबाबाईच्या दर्शनाने करवीरवासियांची दिवाळीची सुरुवात, दर्शनासाठी लांबच लांब रांगा VIDEO
एकदा देवीचे रूप नजरेस पडले की मग आपला सण आणि येणारे वर्ष हे आपल्याला सुखकर जाईल, अशी भावना प्रत्येकाच्या मनात असते. अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि आजूबाजूच्या परिसरातून त्याचबरोबर कर्नाटकातून देखील भाविक या ठिकाणी आले होते. त्यातच लक्ष्मीपूजन असल्यामुळे देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, असं पुजारी प्रसाद मुनिश्र्वर यांनी सांगितले.