कोल्हापूर, 22 डिसेंबर : चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचा धोका वाढतच चालला आहे. त्यामुळे सगळ्यांचे टेन्शन वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देखील सतर्कता बाळगण्यात येत आहे. त्यामुळेच मंदिरात असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याच्या सूचना मंदिर समितीकडून देण्यात आलेल्या आहेत.
चीनमध्ये पुन्हा थैमान घालत असलेला कोरोना ही भारतातील नागरिकांना सतावत असणारी चिंतेची बाब बनली आहे. यासाठी केंद्र शासन सतर्कतेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेत आहेत. राज्य शासनाकडून देखील या पार्श्वभूमीवर योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत. कोल्हापुरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिराच्या कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिलेली आहे.
भाविकांनी घाबरू नये
केंद्र शासनाचे नुकतीच कोरोना विषयक काही नियमावली जाहीर केलेली आहे. राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही नियमावली दिली गेलेली नाही. तरीही सतर्कता म्हणून अंबाबाई मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. यामध्ये मंदिरात येणाऱ्या भाविकांना कोणतीही मास्क सक्ती लागू करण्यात येत नाही आहे, असे नाईकवाडे यांनी सांगितले.
कोरोनाची धास्ती! शिर्डी, कोल्हापूर आणि पुण्याच्या मंदिरात नवी नियमावली
संपूर्ण देशभरातून भाविक अंबाबाई मंदिरात येत असतात. त्यांच्या संपर्कात मंदिरातील कर्मचारी येत असतात. तर मंदिरातील प्रत्येक कर्मचारी हा दिवसातून किमान 10 ते 15 हजार भाविकांच्या संपर्कात येत असतो. त्यामुळे संक्रमण वाढण्याचा धोका वाढतो. तर हा प्रकार टाळण्यासाठी गर्दीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. तर या बाबतीत कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी भाविकांनी घाबरून जाऊ नये. राज्य सरकारचे निर्देश येईपर्यंत कोणताही अन्य निर्णय देवस्थानकडून घेतला जाणार नाही, असे देखील नाईकवाडे यांनी स्पष्ट केले आहे.
अंबाबाई मंदिरात किती कर्मचारी ?
कोल्हापूरचे श्री अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. त्यामुळे इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. जवळपास 175 कर्मचारी सध्या मंदिरात कार्यरत आहेत. यामध्ये सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी, इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.
देशात कोरोनाचा कहर वाढू नये म्हणून तज्ज्ञांनी केल्या गंभीर सूचना, Video
दरम्यान कोल्हापूर प्रशासन देखील कोरोनाच्या पुन्हा वाढणाऱ्या धोक्यामुळे सतर्क झाले आहे. तर विमानतळावर देखील बाहेरून येणाऱ्या सर्व प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधासाठी असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन कोल्हापूर विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india, Kolhapur, Local18