कोल्हापूर, 20 जानेवारी : वडापाव म्हटलं की एका पावासोबत मिळणारा बटाटेवडा आपल्या नजरेसमोर येतो. पण याच वड्यासोबत मराठी चित्रपटाच्या व्हिलनचं नाव समोर आलं तर...कोल्हापूर हे घडतंय. कोल्हापुरातल्या एका कॅफेमध्ये मराठी चित्रपटाच्या गाजलेल्या व्हिलन्सची नावं वडापाव आणि इतर पदार्थांना देण्यात आली आहेत. या कॅफेत येणाऱ्या ग्राहकांना ही नावं आवडत असून या आगळ्या वेगळ्या कॅफेची सध्या कोल्हापूरमध्ये चर्चा आहे.
काय आहे कल्पना?
कोल्हापूर शहरातील आझाद चौक, रविवार पेठ येथे असणाऱ्या व्हीलन्स अड्डा या ठिकाणी हे अनोख्या नावाचे पदार्थ मिळतात. सत्यजित महाडिक, राजेश नलवडे आणि रमिज मुल्लाणी या तीन मित्रांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अनुभवासाठी बऱ्याच ठिकाणी काम केलं. स्वतःचा व्यवसाय सुरु करताना कोल्हापूरकरांना काही तरी वेगळं खायला मिळावं म्हणून त्यांनी हा कॅफे सुरू केला. या कॅफेची कल्पना पहिल्यापासूनच त्यांच्या डोक्यात होती.
कशी ठरवली नावं?
'कॅफेतील पदार्थांना व्हिल्सची नावं द्यायची ठरलं होतं. पण, कोणते व्हिलन्स घ्यायचे हे ठरत नव्हतं. आम्ही 90 च्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या नावांचा आम्ही विचार केला. त्यांच्या भूमिकेप्रमाणे त्या पदार्थाला चव दिली. कुबड्या खविस या नावाप्रमाणे थोड्या वेगळ्या फ्लेवरचा वडापाव, सगळ्यांपेक्षा वरचढ ठरणारा तात्या विंचू म्हणून त्याचा नावाचा वडापाव सगळ्यात जास्त लोडेड आहे,' असं या कॅफेचे मालक सत्यजित महाडिक यांनी सांगितलं.
वडापावचा 'जुगाडी अड्डा' एकाच ठिकाणी आहेत 30 पेक्षा जास्त पर्याय, Video
कसे बनवतात हे वडापाव ?
या कॅफेत मिळणारा वडापाव प्रत्येक नावाप्रमाणे वेगळा आहेत. प्रत्येकाच्या स्टफिंगमध्ये फरक आहे. वापरण्यात येणाऱ्या सॉस आणि चटणीमध्ये देखील बदल असतो. त्यामुळेच प्रत्येकाची चव वेगळी आहे, असे कॅफेचे दुसरे मालक राजेश नलवडे यांनी दिली आहे.
काय आहे वडापाव पिझ्झा ?
या ठिकाणी वडापाव पिझ्झा हा वेगळा प्रकार देखील खायला मिळतो. आपण पिझ्झा हे वेगवेगळ्या प्रकारचे बघतो, त्यांपैकीच एक वडापाव पिझ्झा हा वेगळ्या पद्धतीचा पिझ्झा आम्ही सुरू केला आहे. यामध्ये वडापाव आणि पिझ्झाची एकत्र अशी एक डिश आम्ही खवय्यांसाठी आणली आहे आणि ती ग्राहकांना आवडतही आहे, असे देखील राजेश यांनी सांगितलं.
किती आहे किंमत?
सामान्यतः वडापाव हा 10 रुपयांना मिळतो. पण व्हीलेन्स अड्डा या ठिकाणी 12 ते 40 रुपये अशी वडापावची किंमत त्याचबरोबर 80 ते 120 रुपयांना वडापाव पिझ्झा आणि 90 ते 160 रुपयांना स्नॅकी टॉवर मिळतात. मराठी चित्रपटाच्या व्हीलेन्सनी आपल्या प्रत्येकाच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं आहे. त्यामुळे हे पदार्थ खाताना त्यांच्या आठवणींना नवा उजाळा मिळतोय.
व्हिलन्स अड्डाचा पत्ता
व्हीलन्स अड्डा, आझाद चौक, डीआरके कॉलेज जवळ, रविवार पेठ, कोल्हापूर - 416001
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Local18, Local18 food, Vadapav