कोल्हापूर, 04 फेब्रुवारी : कोल्हापूर च्या रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने समाजातील गरजू घटकांना सहाय्य रोटरी कडून केले जाणार आहे. कोल्हापूरच्या खवय्यांना सोबत घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आयोजित अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सव 2023 हा 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान पार पडत आहे. या महोत्सवास भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विविध खाद्यसंस्कृतीची ओळख होऊन प्रत्येकाची रसना तृप्त होईल यात शंका नाही, असा विश्वास रोटरी क्लबने व्यक्त केला आहे. कोल्हापूर शहरातील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदानावर सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत हा महोत्सव सर्वांसाठी खुला असणार आहे. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे खाद्य महोत्सवाबरोबरच येणाऱ्या खवय्यांना सुरेल मैफलींचा आस्वाद देखील घेता येणार आहे.
असे आहेत स्टॉल्स या खाद्य आणि खरेदी महोत्सवात एकूण 120 स्टॉल धारकांनी आपले स्टॉल लावलेले आहेत. त्यापैकी 90 स्टॉल हे विविध वस्तूंच्या विक्रीसाठी आहेत. यामध्ये फोटो फ्रेम, लाईट्स, पेढेवाले, खानदेशी नमकिन बिस्कीट, लाकडी घा शुद्ध तेल, नमकीन, लेडीज कटलरी, अनेक प्रकारच्या लाकडी वस्तू, कपडे, चहा पावडर, लोणचे आदी घटक विक्रिसाठी आहेत. तर 30 स्टॉल हे खाद्य पदार्थांचे आहेत. यामध्ये उसाचा रस, फ्रूट ज्युज, स्वीट कॉर्न, चायनीज, थालीपीठ, डोसा, पाणीपुरी, सँडविच, फ्रेंच फ्राईज, वडा कोंबडा, बिर्याणी आदी खाद्यपदार्थ विक्रीला ठेवण्यात आले आहेत. असे असतील कार्यक्रम 4 फेब्रुवारी रोजी रॉकबँड, 5 फेब्रुवारी रोजी मराठमोळी ठसकेदार लावणी असे कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोठा स्टेज देखील उभारण्यात आला आहे. तर या महोत्सवाचा समारोप 6 तारखेला होईल, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी पाटील यांनी सांगितले.
Wardha Sahitya Sammelan : साहित्य संमेलनात वर्धा जिल्ह्यातील 235 पुस्तकांचं प्रकाशन! पाहा Video
गरजूंना मिळणार मदत या अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवातून मिळणारा निधी हा रोटरी क्लब तर्फे गरजू घटकांसाठी वापरला जाणार आहे. यातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. दिव्यांग मुलांना व्हीलचेअर देणे, कर्णबधिरांची तपासणी करुन श्रवणयंत्रे देणे, गरजू-ग्रामीण भागातील मुलांना सायकल वाटप, जयपूर फूटचे वाटप, गरजू क्षयरोगांना धान्य वाटप करण्यात येणार आहे.
कुठे आहे खाद्य महोत्सव ? आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदान, शाहूपुरी, कोल्हापूर