कोल्हापूर, 11 डिसेंबर : मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया शिवाजी विद्यापीठाच्या मैदानात सुरु असल्याने हजारो विद्यार्थी या भरती प्रक्रियेत सहभागी होत आहेत. दरम्यान या भरती प्रक्रिये दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेत जोश निर्माण होण्यासाठी तरुणांकडून स्टेरॉइडचा वापर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान जोष आणि ताकद तयार करण्यासाठी स्टेरॉइडचे इंजेक्शन वापरून भरतीला उतरणाऱ्यांची मोठी संख्या असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापुरात सुरू असलेल्या अग्निवीर भरती प्रक्रियेत दोन दिवसांपूर्वी स्टेरॉइडच्या ओव्हरडोसमुळे एक तरुण बेशुद्ध पडल्याची घटना समोर आली आहे.
हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी 11 पोलीस कर्मचारी निलंबित
यामुळे भरती प्रक्रिया राबवणाऱ्या यंत्रणेत एकच खळबळ माजली. भरतीस्थळी असलेल्या स्वच्छतागृहात तर स्टेरॉइडच्या इंजेक्शनचा अक्षरश: खच पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेदरम्यान होणारा स्टेरॉइडचा वापर आणि बाजार उघडकीस आला आहे.
भरती प्रक्रियेदरम्यान धावण्याच्या चाचणीत तरुणांसमोर प्रचंड स्पर्धा असते. या स्पर्धेत मागे पडणारा मागेच राहतो, त्यामुळे धावण्याची क्षमता वाढविण्यासाठी तरुणांकडून स्टेरॉइड इंजेक्शनचा वापर केला जातो. चाचणी सुरू होण्याआधी काही मिनिटे हे इंजेक्शन घेतल्यानंतर तरुणांमध्ये तात्पुरती ऊर्जा वाढते, परिणामी स्पर्धेत त्याची धावण्याची गती वाढते.
दोन दिवसांपूर्वी हातकणंगले तालुक्यातील तरुण भरती प्रक्रियेसाठी आले होते. मध्यरात्रीनंतर एका तरुणाने हे इंजेक्शन घेतले. त्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. तरुण बेशुद्ध पडताच त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. तातडीने उपचार केल्याने अनर्थ टळला.
हे ही वाचा : ...आम्ही समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करणार होतो पण.., अजितदादांनी बोलून दाखवली खंत
अनेक उमेदवार येतानाच स्वत:सोबत स्टेरॉइडचे इंजेक्शन घेऊन येतात. सायबर चौकात स्टेरॉइडच्या इंजेक्शनची विक्री करणारे एक रॅकेट सक्रिय असल्याचीही माहिती मिळाली. पाच हजार रुपयांना एका इंजेक्शनची विक्री केली जात आहे, त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या तरुणांचे अज्ञान आणि असहायतेचा गैरफायदा घेऊन हजारो रुपयांची लूट सुरू असल्याचेही समोर येत आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Army, Indian army, Kolhapur