कोल्हापूर, 26 नोव्हेंबर : कचरा उठाव आणि कचऱ्याची विल्हेवाट हे कधीही पूर्णपणे न सुटणारे प्रश्न आहेत. याला बऱ्याच वेळा प्रशासनाची अपुरी व्यवस्था आणि नागरिकांचा बेजबाबदारपणा दोन्ही गोष्टी तितक्याच कारणीभूत ठरत असतात असं कित्येक वेळा निदर्शनास आले आहे. नुकतीच कोल्हापुरा तल्या कबनूर गावात देखील घनकचऱ्यावरून एक घटना घडली होती. कचरा उठाव वेळच्या वेळी होत नसल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी हा कचरा चक्क बँजोच्या तालावर ग्रामपंचायत कार्यालयात आणून टाकला होता. या घटनेमुळे घनकचऱ्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा नव्याने प्रकाशझोत पडला. कोल्हापूर शहर परिसरात आणि उपनगरात देखील घनकचऱ्याचा प्रश्न नेहमी डोकं वर काढत असतो. कोल्हापूर शहरातील जवळपास सर्व कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या आहेत. शहरात सर्व ठिकाणी घंटागाडी कचरा उचलण्यासाठी येते. पण बऱ्याचदा या घंटागांड्यांकडून कचरा उठाव वेळोवेळी किंवा नीट होत नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कचरा साचून राहतो. खरतर महानगरपालिकेने ज्या ठिकाणी पूर्वी कचरा टाकण्यासाठी कंटेनर्स ठेवले होते. त्या ठिकाणी कचरा न टाकण्याच्या आवाहनाचे बोर्ड सध्या लावले आहेत. परंतु पुन्हा पुन्हा तिथे कचऱ्याचे ढीग बघायला मिळतात.
कोल्हापूरच्या हॉटेलचा नाद खुळा! वेटरच्या जागी काम करतात चक्क रोबो, Video
कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करावी फुलेवाडी परिसरात या ठिकाणी पूर्वी एक कचराकुंडी होती. पण ती आता काढून टाकली आहे. पण नागरिक पूर्वी प्रमाणे येता-जाता याच ठिकाणी कचरा टाकत असतात. त्यात पुढे चौकात असणाऱ्या भाजीच्या दुकानातील शिल्लक कचरा देखील इथेच टाकला जातो. त्यामुळे या परिसरात नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे एकतर कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा पूर्वीप्रमाणे कचराकुंडी आणून ठेवावी, असे नागरिक विक्रमसिंह माने यांनी सांगितले. नागरिकांनी इतर कुठेही कचरा न टाकता तो घंटागाडी मध्येच द्यावा उपनगरात तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीग पडलेले बऱ्याच वेळा दिसतात. नागरिक गाडीवरून जाता जाता हा कचरा टाकून जात असतात. परंतु नागरिकांनी इतर कुठेही कचरा न टाकता तो घंटागाडी मध्येच द्यावा, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिका उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांनी केले आहे.
Kolhapur : चहाप्रेमींना पर्वणी, एकाच ठिकाणी मिळतात जगभरातील 20 चहा, Video
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत 169 ऑटो टीप्पर गाड्यांच्या माध्यमातून नियमित कचरा उठाव केला जातो. कोल्हापुरातील सर्व प्रभाग आणि उपनगरांमध्ये सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ओला आणि सुका कचरा असा वेगवेगळा संकलित केला जातो. तरी देखील बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकल्याची बाब निदर्शनास येते. पूर्वी शहरात ठेवण्यात आलेले कचऱ्यासाठीचे कंटेनर्स हे कंटेनर मुक्त कोल्हापूरच्या दृष्टीने जवळजवळ सर्वच ठिकाणांवरुन काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे तिथे कचरा उघड्यावर टाकला जात आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन आहे की, आपल्या परिसरात कचऱ्याची घंटागाडी आल्यानंतर त्या घंटागाडी कडेच आपला कचरा टाकावा. बाहेर कुठेही उघड्यावर कचरा टाकू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई देखील करण्यात येईल, असे उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांनी सांगितले. कचरा संकलनाच्या या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉर रुम त्याचबरोबर कोल्हापूर महानगपालिकेमार्फत कचरा संकलनाच्या या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक वॉर रुम देखील बनवण्यात आली आहे. तसेच या कचरा संकलनाबाबत किंवा परिसरातील स्वच्छतेबाबत नागरिकांना कोणतीही समस्या असेल, तर महानगरपालिकेच्या 97 66 53 20 37 या हेल्पलाईन व्हॉट्स ॲपनंबरवर मेसेज केला. तर त्या समस्येचे लवकरात लवकर निवारण करण्यात येईल, असे देखील आडसूळ यांनी स्पष्ट केले आहे.