ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 12 मार्च : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर (Maharashtra Government) टीका केली. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस अधिकारी बदली प्रकरणाबाबत विधानसभेत जो पेनड्राईव्ह सादर केलाय त्यावरुन त्यांना पोलिसांनी नोटीस (Police noticed) बजावली आहे. या प्रकरणात सीबीआय (CBI) चौकशी झाल्यानंतर सीबीआयचा जो रिपोर्ट समोर आल्यानंतर कोण-कोण आतमध्ये (जेलमध्ये) जाणार हे सांगता येणार नाही, असं सूचक विधान चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे त्यांचा रोख महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेते आणि मंत्र्यावर असल्याचं स्पष्ट झालंय. पण त्यांनी कोणत्याही नेत्याचं किंवा मंत्र्याचं नाव घेतलेलं नाही. याशिवाय त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा उल्लेख केला. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? “हे गोंधळून गेले आहेत. घाबरुन गेले आहेत. त्यांचे एका मागेमाग एक मंत्री जेलमध्ये जात असल्याने विरोधी पक्षाचंही कोणतीरी आतमध्ये जायला पाहिले त्यासाठी भाजप नेते गिरीश महाजनांवर केस तयार केली गेली. सरकारचं जे रिमोट कंट्रोल करत आहेत (नाव न घेता शरद पवारांचा उल्लेख), त्यांना 50 वर्षांच्या राजकारणामुळे खूप गोष्टी कळतात. हे सगळे भांबावून गेले आहेत. मग त्यांनी एक इंजेक्शन दिलं की यांना धावावंच लागतं. तसं आता इंजेक्शन मिळालं असेल, अरे आता करताय का? आपले सगळे लोकं कसे फटाफट आतमध्ये चालले आहेत. हे इंजेक्शन दिल्यामुळे ते उठून काहीतरी चुकीचं करायला लागले आहेत. बदल्यांमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचा डाटा तुम्हाला कसा मिळाला असं हे प्रकरण आहे. आता याप्रकरणात सीबीआय चौकशी झाली आणि सीबीआय चौकशीत काय रिपोर्ट बाहेर येणार आहे, कोणकोण आतमध्ये जाणार हे सांगता येणार नाही”, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजप कार्यकर्ते राज्यभरात नोटीशीची होळी करणार देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या गृह विभागाने नोटीस पाठवल्याने भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आमची जान आहे. त्यामुळे भाजपचे असंख्य कार्यकर्ते उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. तर राज्यभरात कार्यकर्ते नोटीशीची होळी करणार, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना ज्यावेळेस चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले त्यावेळेस त्यांना आठ ते नऊ तास पोलीस ठाण्यामध्ये बसून ठेवण्यात आलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्या कितीवेळ पोलीस ठाण्यामध्ये बसवून ठेवतात हे पहावे लागेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे. तर सीबीआयला सुपूर्द केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये अनेकांची नावे पुढे येणार असल्याने सगळे हादरले असल्याचे त्यांनी म्हंटलं. तसेच पाच राज्यांच्या निकालानंतर आमचा आत्मविश्वास वाढला असून त्याची सुरवात आता सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. ( PUNE VIDEO: तरुणाला चिरडल्यावर चालकाने टाकला रिव्हर्स गिअर, अन् भरधाव वेगात…. ) ‘बुडत्याचा पाय खोलात’, चंद्रकांत पाटलांची टीका “या सरकारचा चोराला सोडून सावाला पकडण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न गेले दोन-अडीच वर्षांपासून सुरु आहे. पण बुडत्याचा पाय खोलात, विनाशकाली विपरीत बुद्धी, तसं त्यांनी बदल्यांमधील अनियमितेबाबत देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सादर केली. याबाबत त्याची चौकशी लावून, संबंधित माहिती मिळाली कशी अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली. विरोधी पक्षनेत्याला अशा प्रकारची माहिती कुठून मिळाली हे विचारता येणार नाही. अन्यथा त्याला विरोधी पक्षनेता म्हणून काम करता येणार नाही. विरोधी पक्षनेता का असतो? सरकारवर अंकूश ठेवण्यासाठी, सरकार बेलगाम होऊ नये म्हणून विरोधी पक्षनेता असतो. आता या अंकुशासाठी त्याला माहिती काढावी लागणारच नाही. विरोधी पक्षनेत्याला माहिती कुठून मिळाली हे विचारु शकत नाही, असं कायद्याचं म्हटलं आहे. तुम्ही त्या मिळालेल्या माहितीचं काय केलं? फडणवीसांना बोलवायचं असेल तर सीबीआय बोलवेल”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.