चंद्रकांत बनकर (रत्नागिरी), 15 नोव्हेंबर : सततच्या अपघातामुळे कशेडी घाट मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. काल (दि.14) सोमवारी मध्यरात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गुहागर येथून मुंबईला प्रवासी घेऊन जाणारी खाजगी आराम बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने चक्क दरीत कोसळता कोसळता वाचली. या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी असल्याची माहिती आहे. कठड्याला धडकून अर्धी बस दरीच्या बाजूला झुकलेली होती एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारचा हा अपघात असल्याचे बोलले जात आहे.
मात्र सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून बसमधील सर्व प्रवासी महामार्ग पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दरम्यान या अपघातात कोणतीही जिवीत हानी किंवा जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले. परंतु अपघाताची काही सेकंदात मोठा अनर्थ घडला असता असे पोलिसांनी माहिती दिली.
हे ही वाचा : ऐकावं ते नवलचं! बसस्थानकात उभी असलेली बस चक्क चोरीला, बुलडाण्यातील घटनेने खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई -गोवा महामार्गावर ती कशेडी घाटात कशेडी आंबा नजीक गुहागर येथून मुंबईच्या दिशेने बस भरधाव वेगाने जात होती. दरम्यान या घाटात असलेल्या दाट धुक्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहनावरील ताबा सुटून बस खोलदरीमध्ये कठड्याला धडकली. त्यानंतर पुढे जात अर्धी बस दरीकडच्या बाजूला आणि अर्धी बस रस्त्याला कठड्याला अडकून राहिली.
दरम्यान याबाबत अपघात झाल्याचे पाहून इतर वाहन चालक आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी गाव घेत, तसेच स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना सुरक्षित बस मधून बाहेर काढण्यात आले. सर्व प्रवासी बाहेर निघाल्यानंतर पोलिसांनी क्रेन बोलवून अर्धी दरीच्या बाजूला झुकलेली बस सुरक्षित रातोरातच बाहेर काढली. अंगावर शहारे आणणारी ही घटना घडल्यामुळे अनेक प्रवासी घाबरून आपल्या जीव मुठीत घेऊन बसले होते.
दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट हा मृत्यूचा सापळाच बनत चालला असल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या आठवड्यात खेळ होऊन पोलादपूरच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षावर मालवाहू डंपर कोसळून तीन विद्यार्थिनीसह चौघांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच दुसरी घटना घडल्याने नागरिकांनी सताप व्यक्त केला.
हे ही वाचा : महावितरणच्या कारभाराचा शेतकऱ्यांना 'शॉक'! 5 वर्षांपासून हाल कायम, Video
दरम्यान ज्या ठिकाणी बस दरीच्या बाजूने झुकली होती त्या ठिकाणी हजारो फूट खोल दरी आहे. दैव बलवत्तर म्हणून मोठी घटना होता होता वाचली असल्याची स्थानिकांनी प्रतिक्रिया दिली. तर कशेडी बोगद्याचे काम पूर्ण होईपर्यंत कशेडी घाटात पडलेले मोठमोठे खड्डे आणि तुटलेले संरक्षण कठडे दुरुस्त करण्याची मागणी देखील वाहन चालकांकडून करण्यात आली. तुटलेले कठडे आणि पडलेले खोल मोठे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Ratnagiri, Ratnagiri police