मुंबई, 17 एप्रिल : महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी उपस्थित नागरिकांच्या उष्माघाताने झालेल्या मृत्यूंनंतर आता राज्यात राजकीय वातावरणही तापलं आहे. विरोधकांकडून राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार निशाणा साधला जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यक्रमाच्या वेळेवरून सरकारचे कान टोचले तर राज ठाकरे यांनी यापुढे असं होणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्ला दिलाय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. राजकीय लाभासाठी गर्दी जमवायची, तुमच्या संतांना पुरस्कार देतोय हे दाखवण्याचं धोरण या कार्यक्रमात दिसत होतं असा आरोपही त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या महान संतांना महाराष्ट्र भूषण दिल्याबद्दल त्यांच्या भाविकांना प्रचंड आनंद झाला होता. त्या आनंदाचा राजकीय फायदा उठवण्याचे सरकारने ठरवले. खरतरं ‘भारतरत्न’ सारखा पुरस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते एका हॉलमध्ये प्रदान केला जातो. पण, संपूर्ण जगभर त्याचे प्रक्षेपण केले जाते. हा कार्यक्रमसुद्धा त्यापद्धतीने करता आला असता. ह्या कार्यक्रमाची वेळ बघितली तर कुठेही बुद्धी वापरुन काम केलेले दिसत नाही. फक्त राजकीय लाभ उठविण्यासाठी म्हणून गर्दी जमा करायची आणि आम्ही तुमच्या संतांना पुरस्कार देत आहोत असं दाखवायचं हे अत्यंत चुकीचे धोरण यामध्ये दिसत होतं. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं गालबोट टाळता आलं नसतं का? राज ठाकरेंचा सवाल सरकारकडूनच नागरिकांना उन्हात जाऊ नये असं आवाहन केलं जात असताना दुसऱ्या बाजूला सरकारनेच लाखो लोकांना उन्हामध्ये या कार्यक्रमासाठी तडफडत बसायला लावलं होतं. पाण्याची व्यवस्था नाही. डोक्यावर कुठलेही छत नाही. प्रचंड ऊन. त्यामुळे मुंबईच्या वातावरणात आद्रर्ता असल्यामुळे डिहायड्रेशनचे प्रकार दिसत होते. पण, स्वत: सगळे नेते हे व्यासपीठावर एसीच्या बाजूला, स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते असंही आव्हाड यांनी म्हटलं. उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूनंतर आता भाविकांच्या मनात प्रचंड राग आहे. मतांच्या राजकारणासाठी एका संताचा वापर होऊन त्या संतांच्या भाविकांचा मृत्यू होणे हे त्या संतांना मानणा-या कुटुंबापैकी कोणालाच आवडणारे नाही. किंबहुना माझे तर असे मत आहे की, हे संतांनाही आवडलं नसेल. त्या वादात मला पडायचं नाही. पण, ह्या मृत्यूची जबाबदारी कोणालातरी घ्यावीच लागेल. जनसामान्यांचा प्राण हा प्राण नसतो का ? भर उन्हामध्ये एवढा बडेजाव करण्याचे कारण काय होते ? हा कार्यक्रम संध्याकाळी देखिल घेता आला असता. भरदुपारी सुर्य माथ्यावर असतांना कार्यक्रम करण्याची गरजच काय होती ? असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; नेमकी चूक कुठे झाली? राऊतांनी स्पष्टच सांगितलं सरकारवर संताप व्यक्त करताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, संतांचा आणि धर्माचा वापर राजकारणात करावा आणि त्यासाठी बळी द्यावेत. आणि नंतर मतं आपल्याकडेच वळावीत हा प्रयत्न अंगाशी आला आहे आणि यापुढेही येईल. सर्वसामान्य निष्पाप जीवांचा बळी घेऊन राजकारणातील मतं वाढविण्याचा हा कार्यक्रम अत्यंत धोक्याचा आहे हे या प्रकरणातून सिद्ध झालं. आता जबाबदारी कोणाची ? असेही त्यांनी विचारले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.