Home /News /maharashtra /

'...तेव्हा लोक आर्थिक दहशतवादाची पर्वा करत नाहीत', शिवसेनेची भाजपवर सडकून टीका

'...तेव्हा लोक आर्थिक दहशतवादाची पर्वा करत नाहीत', शिवसेनेची भाजपवर सडकून टीका

'जनतेला गृहीत धरले की, वेगळे काय घडणार,' असा टोलाही शिवसेनेनंही लगावला आहे.

    मुंबई, 24 डिसेंबर : झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. काँग्रेस-जेएमएम आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवत भाजपचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता शिवसेनेनंही भाजपवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. 'नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे भाजपच्या हिंदू मतदानाचा टक्का वाढेल अशी त्यांची धारणा होती, पण झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भूलथापा व आमिषांना बळी पडण्याचे नाकारले हे सत्य स्वीकारावे लागेल. लोकांनी ठरवले की ते सत्ता, दबाव व आर्थिक दहशतवादाची पर्वा करीत नाहीत,' अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आली आहे. 'लोकांनी ठरवलं की ते हवा तो बदल घडवून आणतात. महाराष्ट्रात ते झालेच. झारखंडही बेडरपणे बदलाला सामोरे गेले. भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. आता झारखंडही गमावले. हे असे का? याचा विचार करतील अशी त्यांची मानसिकता नाही. जनतेला गृहीत धरले की, वेगळे काय घडणार,' असा टोलाही शिवसेनेनंही लगावला आहे. 'हे भाजपसाठी धक्कादायक...' 'झारखंडमधूनही भारतीय जनता पक्षाचे राज्य गेले आहे. आधी महाराष्ट्र गेले, आता झारखंड गेले. महाराष्ट्र व झारखंड या राज्यांची तुलना करता येणार नाही. मात्र भाजपने आणखी एक राज्य गमावले व पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ राबवूनही झारखंड भाजपला राखता आले नाही. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री होतील. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांची आघाडी बहुमताचा आकडा गाठणार हे स्पष्ट आहे. या आघाडीत सर्वाधिक जागा झारखंड मुक्ती मोर्चाला मिळाल्या आहेत. काँग्रेसनेही दोन आकडी टप्पा गाठला आहे, तर राजदलाही पाच-सात जागा मिळाल्या आहेत. थोडक्यात, काँग्रेस-राजदच्या पाठिंब्यावर झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार तेथे येत आहे. हे भाजपसाठी धक्कादायक आहे. काँग्रेसमुक्त हिंदुस्थानची घोषणा भाजपचे नेते करीत होते, पण अनेक राज्येच भाजपमुक्त झाली,' अशी टीका शिवसेनेनं केली आहे. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मिळाला नवा मुहूर्त, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार? '...तर तेथील जनता भाजपची सत्ता उलथवून लावेल' 'एक महिन्यापूर्वी हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक झाली. तेथेही काँग्रेसने मुसंडी मारली. भाजपची सत्ता तेथूनही जवळ जवळ गेलीच होती, पण ज्या दुष्यंत सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच दुष्यंत यांचा टेकू घेत, त्यांना उपमुख्यमंत्रीपद देत भाजपने कशीबशी सत्ता राखली. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विराजमान झाले. 2018 साली भाजप साधारण 75 टक्के प्रदेशांत सत्ता ठेवून होती. आता घसरगुंडी झाली आहे व जेमतेम 30-35 टक्के प्रदेशांत भाजपची सत्ता दिसत आहे. भाजपची घोडदौड अनेक राज्यांत लंगडी पडली हे चित्र विचार करायला लावणारे आहे. 2018 ला देशातील 22 राज्यांत भाजपची सत्ता होती. ईशान्येकडील राज्यांतही भाजप घुसली. अगदी त्रिपुरा, मिझोरामपर्यंत त्यांचे झेंडे फडकले, पण आज त्रिपुरात निवडणुका घेतल्या तर तेथील जनता भाजपची सत्ता उलथवून लावील अशी स्थिती आहे,' असा इशाराही सामनातून देण्यात आला आहे. 'हिंदू मतदानाचा टक्का वाढेल अशी त्यांची धारणा' 'झारखंडमध्ये श्री. मोदी व श्री. शहा यांनी सभा घेतल्या. मोदी यांच्याच नावावर मते मागितली. गृहमंत्री अमित शहा यांची झारखंडच्या प्रचार सभेतील भाषणे तपासली तर तेथे सरळ हिंदू-मुसलमान असा भेद करायचा प्रयत्न होता हे स्पष्टपणे दिसते. खासकरून नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे भाजपच्या हिंदू मतदानाचा टक्का वाढेल अशी त्यांची धारणा होती, पण झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भूलथापा व आमिषांना बळी पडण्याचे नाकारले हे सत्य स्वीकारावे लागेल,' अशा कानपिचक्याही शिवसेनेनं भाजपला दिल्या आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amit Shah, Shivsena

    पुढील बातम्या