सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी छ.संभाजीनगर, 21 जून : राजकारणात नेत्याने एखादी गोष्ट केली मात्र त्याचे परिणाम अपेक्षित नसले की, तो नेता म्हणतो हा फक्त योगायोग आहे. असाच योगायोग छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे आणि संबंधित नेत्यांनी ही सांगितले हा योगायोग आहे. विशेष म्हणजे, योगाच्याच कार्यक्रमात दोन भाजपच्या बड्या नेत्यांचा राजकीय योगायोग घडला आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड..यांच्यात तसे न दिसणारे न जाणवणारे राजकीय शितयुद्ध आहे असं सांगितलं जातं. दोघेही मराठवाड्यातील आणि दोघेही वंजारी समाजाचे नेतृत्व करणारे. डॉ भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिपद पंकजाताई यांना डावलून दिल्याची चर्चा बरीच गाजली हा झाला इतिहास. पण आज जागतिक योगा दिवस त्यामुळे पंकजाताई आणि डॉ भागवत कराड दोघेही कार्यक्रमाला आमंत्रित होते. गंमत इथेच आहे..दोघांचेही कार्यक्रम एकाच ठिकाणी विभागीय क्रीडा संकुलात होते. कार्यक्रम एकाच ठिकाणी असले तरी दोन्ही कार्यक्रम वेगवेगळे होते. दोन स्टेज दोघांचे वेगवेगळे होते. योगा झाल्यानंतर दोघेही सोबत आले आणि आयुष्यात मनःशांती किती महत्त्वाची आहे हे सांगितलं. ( वारकऱ्यांना सरकारकडून विमा संरक्षण, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा) विभागीय क्रीडा संकुलात शासकीय कार्यक्रमाला डॉ भागवत कराड निमंत्रित होते तर पंकजाताई या संकुलाच्या मध्येच महिला बाल कल्याण समितीच्या कार्यक्रमाला आल्या. सुरुवातीला पंकजाताई यांचा कार्यक्रम सुरू झाला. तेवढ्यात अपेक्षित नसतांना डॉ कराड यांचे तिथे आगमन झाले. मग स्वागत स्वीकारून डॉ.कराड आपल्या कार्यक्रमाला निघून गेले. डॉ.भागवत कराड हे शासकीय कार्यक्रमात योगासन करीत असताना पंकजाताई अपेक्षित नसताना शासकीय कार्यक्रमात अचानक आल्या आणि शेवटचे काही मिनिटे त्यांनी योगासने केली. भाजपच्या दोन कार्यक्रमाची चर्चा रंगत असताना दोन्ही नेत्यांना कळून चुकले असावे. आता ही चर्चा लांबेल म्हणून दोघांनीही आपापल्या परीने चर्चा थांबण्यासाठी प्रतिक्रिया दिल्या. (योगा से ही होगा! चाळिशीतही आपल्या फिटनेसनं तरुणींना लाजवतात ‘या’ अभिनेत्री) पंकजाताई आणि डॉ.भागवत कराड यांनी एकमेकांच्या कार्यक्रम बद्दल आदल्या रात्री कळल्याचे सांगितले आणि एकमेकांना निमंत्रणही दिल्याचे स्पष्टीकरण दिले. असं असलं तरी भाजपच्या कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांची गोची झाली की कुणाच्या कार्यक्रमाला जावं. त्यामुळे नेते कार्यकर्त्यांनी दोन्ही कार्यक्रमाला जाणेच टाळलं. त्यामुळे योगा दिनाच्या दिवशी हा दोन कार्यक्रमाचा योगायोग नक्कीच नव्हता हे खरे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.