जळगाव 12 सप्टेंबर : "देव तारी त्याला कोण मारी" ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. याचाच प्रत्यय देणारी एक घटना जळगावमधून समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या कोळंबा इथे बिबट्याच्या भीतीने एका महिलेनं नदीमध्ये उडी घेतली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुथडी भरून वाहणाऱ्या तापी नदीत झोकून देणाऱ्या लताबाई दिलीप कोळी यांच्यासाठी ते पंधरा तास कधीही विसरता न येणारे आहेत.
अचानक जवळ येत तिघांनी तिला गाडीत ओढलं, पण..; चिमुकलीने असा हाणून पाडला अपहरणाचा डाव
चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील रहिवासी लताबाई दिलीप कोळी ह्या तापी नदी काठावर आपल्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. चोपडा तालुका म्हटलं की पहाडी क्षेत्र आणि त्यातल्या त्यात हिंसक प्राण्यांचा वावर हा निश्चित. अशातच लताबाई यांच्या नजरेस पडलं ते भयावह दृश्य. एक बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या पाठीमागे धावताना लताबाईंना दिसलं. बिबट्या आपलीही शिकार करेल या भीतीने त्यांनी नदीच्या दिशेने धावत दुथडी भरून वाहणाऱ्या तापी पात्रात उडी घेतली.
पाण्यात उडी घेतल्याने लताबाई कोळी ह्या पाण्याच्या प्रवाहात वाहत अमळनेर तसंच पाडळसरे धरण ओलांडून थेट तालुक्याच्या सीमेवरील निम नदी काठावर दुसऱ्या दिवशी सापडल्या. नाविकांना त्या केळीच्या खोडाला मिठी मारलेल्या अवस्थेत आढळून आल्या, महत्त्वाचं म्हणजे त्या सुखरूप होत्या. लताबाई यांनी आपबीती सांगितल्यावर नाविक बांधवांच्या अंगावरही शहारे आले.त्यांनी लगेचच लताबाई कोळी यांना उपचारासाठी मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इथे दाखल केलं.
केळीच्या खोडाच्या आधारे काढली रात्र -
लताबाई पाण्याच्या प्रवाहात वाहत येत होत्या. पाडळसरे धरण ओसंडून वाहत असताना केळीचं खोड त्यांच्या हाताला लागलं. याच झाडाचा आधार घेत निम शिवारात काठालगत पाण्यातच त्यांनी रात्र काढली. सकाळी हे दृश्य नाव चालवणारे शंकर कोळी यांच्या नजरेस पडलं असता त्यांनी निम येथील ग्रामस्थांच्या मदतीने लताबाई यांना बाहेर काढलं. त्यांच्यावर मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इथे उपचार करण्यात आले. सुमारे 14 ते 15 तास पाण्यात वाहत येत केळीच्या खोडाचा आधार घेत त्यांनी स्वतःचा जीव वाचवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain flood