मुंबई, 23 एप्रिल : ‘पंतप्रधानांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे, मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत,’ असं स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूत असा आत्मविश्वास व्यक्त केला. राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका यांची देखील मदत घेण्यात येत असून रुग्णांस तात्काळ योग्य ते उपचार सुरु व्हावेत म्हणून टेलीमेडिसिन व टेली आयसीयूवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमवेत कोविडसंदर्भात आयोजित बैठकीत आज मुख्यमंत्री बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीत देशातील सर्वात जास्त कोविड संसर्ग फैलावलेल्या इतर राज्यांचेही मुख्यमंत्री होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत आहेत तसेच निवृत्त डॉक्टर्सच्या जोडीने वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे अशी ही माहितीही दिली. मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधान मोदी यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागण्या 1. महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला मिळावा. 2. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आलेला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करावे. 3. रेमडीसीव्हीर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही, पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा असेही ते म्हणाले. हेही वाचा - ‘अजित पवार हे कार्यक्षम मंत्री’, पलटवार केल्यानंतर चंद्रकांत पाटील बॅकफूटवर? 4. रेमडीसीव्हीर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठाही नियमित होत राहील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 5. विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनाचा अभ्यास आवश्यक राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ झाली. यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी याबात योग्य तो अभ्यास व्हावा तसेच जिनोम सिक्वेन्सिंग करावे जेणे करून योग्य ते धोरण ठरवता येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.