जळगाव, 21 डिसेंबर: मंत्रोपचार करण्याच्या बहाण्याने एका महिलेचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात (Human sacrifice in jalgaon) उघडकीस आला आहे. जळगाव शहरातील शिवाजी नगर येथील रहिवासी असणाऱ्या 51 वर्षीय महिलेला तिच्याच भाच्यानं गोड बोलून नेत, तिच्यासोबत अघोरी प्रकार केला आहे. आरोपींनी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी (Murder for money rain) संबंधित महिलेला जिवंत जाळून त्यांना एका खड्ड्यात पुरलं आहे. याप्रकरणी जळगाव पोलिसांनी मुख्य मांत्रिकासह दोघांना ताब्यात (2 accused arrested) घेतलं आहे. हा अघोरी प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
माया दिलीप फरसे असं हत्या झालेल्या 51 वर्षीय महिलेचं नाव आहे. संबंधित मृत महिला जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील क्रांती चौक परिसरातील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी संतोष मुळीक या मांत्रिकासह मृताचा चुलत भाचा अमोल दांडगे यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत माया फरसे या शिवाजी नगरातील सारथी पापड कारखान्यात कामाला होत्या.
हेही वाचा-अकलेचा दुष्काळ! YouTube Video पाहून घरीच पत्नीची डिलिव्हरी, बाळाचा मृत्यू
15 डिसेंबर रोजी घटनेच्या दिवशी माया नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ वाजता कारखान्यात कामाला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडल्या. पण सायंकाळनंतरही माया घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली, पण नातेवाईकांना काहीही थांगपत्ता लागला नाही. शेवटी मृताच्या पतीने शहर पोलीस ठाणे गाठत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्या अनुषांगाने पोलिसांनी शिवाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.
हेही वाचा-12 वर्षांनी लहान तरुणावर महिलेचं जडलं प्रेम; अडसर ठरणाऱ्या पतीचा असा काढला काटा
यावेळी मृत माया या चुलत भाचे अमोल दांडगे याच्यासोबत चालत जाताना दिसल्या. त्यानुसार पोलिसांनी अमोल यास ताब्यात घेत चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी पैशांचा पाऊस पाडण्याच्या हव्यासापोटी माया यांना घनदाट झाडीत निर्जनस्थळी नेऊन त्यांना जिवंत जाळलं आहे. यानंतर आरोपींनी माया यांना जंगल परिसरातच निर्जनस्थळी पुरलं. याप्रकरणी पोलिसांनी मांत्रिकासह मृत महिलेच्या भाच्याला अटक केली आहे. आरोपी संतोष मुळीक याच्या घरात पोलिसांना जादूटोणा करण्याचं अघोरी साहित्य आढळलं आहे. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Jalgaon