मुंबई, 13 नोव्हेंबर : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान झाल्यानंतर आता साहेबाच्या देशात नेलेला आपला ऐतिहासिक ठेवा परत मिळवण्याचे प्रयत्न नव्याने सुरू झाले आहेत. त्यापैकीच एक आहे - छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार. ब्रिटीश राजघराण्याच्या संग्रहात असलेली ही रत्नजडित तलवार महाराष्ट्राला परत मिळावी म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. पण या निमित्ताने छत्रपतींच्या तीन दैवी तलवारी कुठल्या आणि त्या सध्या कुठे आहेत याविषयी तुम्हाला माहीत आहे का?
छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार लंडनमधून महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पण महाराजांच्या 3 तलवारी आज नेमक्या कुठे आहेत माहितीये का? स्पेन, पोर्तुगाल, महाराष्ट्रापासून लंडनपर्यंतचा इतिहास...
तुळजा, भवानी आणि जगदंबा या छत्रपतींच्या तीन दैवी तलवारी होत्या. सर्वांत चर्चेत असणारी भवानी तलवार ही कुठे आहे याबद्दल अनेक समज- गैरसमज होते. भवानी तलवान रत्नजडित असून ती स्पेनमध्ये तयार करण्यात होती, असं काही इतिहासकार सांगतात. शिवाजी महाराजांचे सरदार अंबाजी सावंत यांनी कोकणात एका पोर्तुगीज जहाजावर हल्ला करून जो ऐवज हस्तगत केला, त्यातील एक नामी तलवार छत्रपतींना खूप भावली. मग त्यांनी खास स्पेनमधून तशीच तलवार करवून घेतली, असं म्हणतात. त्याच्या मुठीला हिरे- माणकं जडवली गेली.
जी जगदंबा तलवार आता परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तीच भवानी तलवार असल्याचा समज अनेक दिवस होता. पण छत्रपतींच्या पावन स्पर्शाने आणि थेट तुळजा भवानीच्या आशीर्वादाने पुनित झालेली ही तलवार महाराष्ट्रातच आहे. सातारचे छत्रपती उदयनराजे यांच्या संग्रहात ती आहे. दरवर्षी दसऱ्याच्या शस्त्रपूजेच्या वेळी या भवानी तलवारीची विधीवत पूजा केली जाते.
तिसरी तुळजा तलवार ही त्यांना शहाजीराजांकडूनच मिळालेली होती, असं मानतात. या तलवारीचा ठावठिकाणाही बरेच वर्षं लागत नव्हता. पण इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या मते, सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या मंदिरात काचेच्या पेटीत जपून ठेवलेली तलवार हीच छत्रपतींची तुळजा तलवार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.