पालघर, 4 सप्टेंबर : महाराष्ट्राने नुकतंच काही दिवसांपूर्वी विनायक मेटे यांच्या रुपाने एक खूप मोठा नेता गमावला. विनायक मेटे यांचं मुंबई-पुणे महामार्गावर अपघाती निधन झालं होतं. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन निघणार नाही. या घटनेला अवघे काही दिवस झाले असताना आज पुन्हा एक वाईट बातमी समोर आली आहे. देशाचे सर्वात मोठ्या उद्योगपतींमधील एक असलेले आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं आज अपघाती निधन झालं आहे. पालघर जिल्ह्यात ही दुर्देवी घटना घडली आहे. सायरस मिस्त्री हे आपल्या मर्सिडीज कारने मुंबई-अहमदाबाद मार्गाने प्रवास करत होते. या दरम्यान पालघर जिल्ह्यात एक अनपेक्षित घटना घडली. पालघर जिल्ह्यात सूर्या नदीच्या पुलावरुन गाडी जात होती. यावेळी चारोटी गावाजवळ पूलावर गाडीची डिव्हायडरला जोराची धडक बसली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा वेग जास्त होता. त्यामुळे गाडीवर चालकाचं नियंत्रण राहिलं नाही. यावेळी गाडीची डिव्हायडरला जोरदार धडक बसली. ही धडक अत्यंत भयानक होती. या धडकमुळे मर्सिडीज कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला आणि गाडीत असलेले उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं निधन झालं. ( टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू; भयंकर अपघाताचा पहिला Video आला समोर ) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मिस्त्री यांच्या गाडीचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या अपघातामुळे देशाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे मिस्त्री यांची अपघातग्रस्त कार ही प्रचंड महागडी कार आहे. गाडीचे एअरबॅग्सही निघालेले दिसत आहेत. पण तरीही मिस्त्री यांचा प्राण वाचू शकला नाही.त्यांच्या अपघाती निधनामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सायरस मिस्त्री यांच्याविषयी माहिती सायरस मिस्त्री हे व्यावसायिक जगतात सामान्य नाव नाही. ते प्रसिद्ध भारतीय वंशाचे खरबापती पलोनजी शापूरजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र आहेत. सायरस मिस्त्री यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी मुंबईत झाला. 1992 मध्ये सायरस मिस्त्री यांनी भारतातील आघाडीच्या वकीलांपैकी एक असलेल्या इक्बाल छागला यांची मुलगी रोहिका छागला हिच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुलगे आहेत. सायरस मिस्त्री यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि एंड जॉन कॉनन स्कूलमधून केले. त्यानंतर ते सिव्हिल इंजिनीअरिंगसाठी लंडनला गेले. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून (व्यवस्थापन) पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याच्याकडेही वडिलांप्रमाणे आयरिश नागरिकत्व आहे. सायरस मिस्त्री यांनी 1991 मध्ये त्यांच्या वडिलांच्या व्यवसाय पालोनजी शापूरजी ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1994 मध्ये शापूरजी पालोनजी ग्रुपचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आपल्या वडिलांप्रमाणे, सायरस मिस्त्री यांनी भारतात अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले, ज्यात सर्वात उंच निवासी टॉवर बांधणे, सर्वात लांब रेल्वे पूल बांधणे आणि सर्वात मोठे बंदर बांधणे. पालोनजी मिस्त्री ग्रुपचा व्यवसाय कापडापासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.