मुंबई, पुणेसह कोल्हापूरला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं झोडपलं

मुंबई, पुणेसह कोल्हापूरला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं झोडपलं

मुंबईसह उपनगर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर: मुंबईसह उपनगर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. याशिवाय पुढच्या 3 ते 4 तासांत रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.

हेही वाचा..संभाजीराजेंचा गैरसमज झाला, ते अर्धवट बोलले याचा खेद वाटतो- विजय वडेट्टीवार

कल्याण-डोंबिवलीत मुसळधार...

दिवा, डोंबिवली, कल्याण आणि ग्रामीण भागात सुद्धा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

मलंगगड परिसरात जोरदार हवा सुटली असून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या वीस मिनिटांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी चिंतातूर झाला आहे.

कोल्हापूर शहराला मुसळधार पावसाने झोडपले

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना या पावसानं मोठा दिलासा दिला आहे. गेल्या तासभरापासून कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे. गडहिंग्लज, चंदगड भागातही जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक मंदावली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला हवामान विभागानं 48 तासांचा यलो अलर्ट जारी केला आहे.

दुसरीकडे, विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड तालुक्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.

दरम्यान, संपूर्ण राज्यभर आर्द्रतेत वाढ झाल्याने उकाडा वाढणार आणि त्याबरोबरच दुपारनंतर धुवांधार वादळी पाऊसही पडण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज मान्सूनसारखा सर्वदूर वर्तवण्यात आलेला नाही. काही भागात अतिमुसळधार पाऊस पडू शकतो तर थोड्याच अंतरावर पावसाचं प्रमाण कमी असू शकतो. यामुळे कमी वेळात अधिक पाऊस बरसण्याचा धोका आहे. त्याबरोबर विजांचाही धोका असल्याने हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई वगळता संपूर्ण कोकण परिसरात शनिवार आणि रविवारी काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मराठवड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातल्या बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह आणि विजांसह पाऊस येऊ शकतो. त्यामुळे शेतात कामासाठी बाहेर पडताना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंगळवारपर्यंत मराठवड्यात असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा...राकेश रोशन यांच्यावर गोळीबार प्रकरणातील कुख्यात गँगस्टरला अखेर अटक

अंदमानजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा अधिकाधिक तीव्र होत असल्याने महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना धोका असल्याची वेधशाळेची माहिती आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 10, 2020, 4:46 PM IST

ताज्या बातम्या