प्रितम पंडीत (सोलापूर), 26 नोव्हेंबर : एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेमध्ये शाईफेक झाल्याने अचानक गोंधळ उडाला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून काळी पावडर फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर सदावर्ते पत्रकार परिषद घेत असताना जोरदार घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर आरोपही केले आहेत.
मागच्या काही दिवसांपासून सीमाप्रश्नाचा वाद उफाळला आहे. यावर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडत होते. यावेळी अचानक त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तिने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी या व्यक्तिला पकडले. मात्र, त्याचवेळी मागे उभ्या असलेल्या अन्य एका व्यक्तीने आपल्या खिशातून शाई काढून सदावर्तेंच्या अंगावर फेकली. तसेच काळे कापड दाखवत घोषणाबाजी केली.
सोलापूर : एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर काळी पावडर फेकण्याचा प्रयत्न pic.twitter.com/uLyC7q3oCd
— News18Lokmat (@News18lokmat) November 26, 2022
हे ही वाचा : राऊतांचा अनुभव मोठा, त्यांना सिल्वर ओकवरून....; राधाकृष्ण विखे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
हे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेड संघटनेचे आहेत. त्यांनी गुणरत्न सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करत असल्याचा आरोप केला. तसेच सदावर्तेंच्या वेगळ्या राज्यांच्या मागण्यांचा निषेध नोंदवला. सदावर्तेंनी मराठा आरक्षणालाही विरोध केल्याचा मुद्दा उपस्थित करत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्तेंचा जाहीर निषेध अशीही घोषणाबाजी यावेळी झाली.
पत्रकार परिषदेतील राड्यानंतर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आज भारतीय संविधान दिन आहे. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, संजय राऊत, बिळातले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पिलावळींना माझ्या संवाद यात्रेने सळो की पळो केलं आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.”
संभाजी ब्रिगेडने शाई का फेकली?
शाई फेक का केली यावर बोलताना संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सोमनाथ राऊत म्हणाले, “आज भारतीय संविधान दिवस आहे. गुणरत्न सदावर्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहु महाराज आणि सर्व महापुरुषांच्या महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. त्यामुळे सदावर्तेंना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही हीच संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद पेटला; कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या बसेस अडवल्या, सीमाभागात तणाव
आम्ही सदावर्तेंच्या अंगावर काळी शाई फेकली आणि काळे कापड दाखवून निषेध केला आहे. ते महाराष्ट्राकडे अशाच वाकडे नजरेने पाहत असतील त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. हे सदावर्ते बोलत नसून ते भाजपाचं पिल्लू आहे. भाजपाने महाराष्ट्र तोडायचा ठरवलं आहे. आम्ही हे होऊ देणार नाही. महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड जळवळ जीवंत आहे हे आम्ही भाजपाचं पिल्लू सदावर्तेंना सांगू इच्छितो, असं मत सोमनाथ राऊत यांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.