प्रितम पंडीत (सोलापूर), 26 नोव्हेंबर : मागच्या चार दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील 40 गावे आमच्याकडे येणार असल्याचे खळबळजणक वक्तव्य केले. यावरून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. यानंतर पुन्हा कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट आणि सोलापूरही आमचाच भाग असल्याचे सांगितले. यावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. याचा परिणाम आता सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.
दरम्यान या प्रकरणावर पडदा पडत असताना पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यातील वातावरण तापले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यात बसला काळे फासण्याच्या घटना घडल्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमांवर बस सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे.
हे ही वाचा : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य आताच का? खडसेंनी सांगितला भाजपचा 'मास्टर प्लान'
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या बसेस सीमेवर अडवल्याने काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. यानंतर महाराष्ट्राकडूनही कर्नाटकच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान दोन्ही राज्यातील ताणवाचे वातावरण निवळेपर्यंत बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.
सोलापूर - गुलबर्गा मार्गावरील हिरोळीजवळ तीन बसेस आणि दुधणीजवळील सिन्नूर सीमेजवळ दोन बसेस रोखल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 82 प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रवाशांना खाली उतरवण्यात आल्याने यांची गैरसोय झाली आहे. दरम्यान कर्नाटककडून महाराष्ट्राच्या बसेस रोखण्यात आल्याने प्रतिउत्तर म्हणून महाराष्ट्रातील नागरिकांनीही कर्नाटकच्या बसेस रोखून धरल्या आहेत. यामुळे सीमाभागात तणावपूर्ण वातावरण बनले आहे.
हे ही वाचा : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा डिवचलं, आता तर थेट फडणवीसांचं नावच घेतलं!
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जत तालुक्यातील गावांची मागणी केल्यामुळे दोन्ही राज्यातील वाद वाढताना दिसत आहे. कर्नाटकच्या बसला दौंडमध्ये शाई फासण्यात आल्यानंतर कलबुर्गीमध्ये महाराष्ट्राच्या बसला काळे फासण्यात आले आहे. या वाढत्या तणावामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka, Karnataka government, Solapur, Solapur (City/Town/Village), Solapur news, St bus