जळगाव 19 नोव्हेंबर : शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता विरोधकांना थेट इशारा दिला आहे. विरोधकांकडून सातत्याने माझ्यावर कुरघोड्या केल्या जातात. मात्र मी शांततेने काम करणारा माणूस आहे. मी माझं पालकमंत्री पद आणि सरकार अजून कोणाला दाखवलं नाही. जर मी दाखवलं तर बरीच लफडी माझ्याकडे आहेत, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे.
'सावरकरांबाबत राहुल गांधींच्या मनात ठासून भरलेला तिरस्कार...'; ठाकरे गटाने पुन्हा सुनावलं
दरम्यान राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शुक्रवारी संजय राऊत यांनी थेट इशारा दिला होता, की महाविकास आघाडीत फूट पडू शकते. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, की होय मी सुद्धा महाविकास आघाडीत फूट पडण्याची वाट बघतोय. गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया देत विरोधकांवर बोचरी टीका केली आहे.
गुलाबराव पाटील यांनी नुकतंच उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला होता. धरणगाव शहरातील बसस्थानकात रात्री उशीरापर्यंत विद्यार्थीनींना बस मिळाली नाही, त्यामुळे विद्यार्थीनींना रडू कोसळलं. याबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केला. शेगावला कार्यक्रम असल्यामुळे सर्व बसेस बुक होत्या, असं ते म्हणाले.
मुंबईला आमचा तसंच उद्धव ठाकरेंचा मेळावा होता. त्यावेळीही मुली बसस्थानकात अडकून पडल्या होत्या. मात्र त्यावेळी आंदोलन झालं नाही. आता काँग्रेस हा त्यांचा लव्हली प्रेम करणारा पक्ष आहे. त्यांचे राजे येत आहेत, त्यांच्यासाठी बसेस गेल्या आहेत. या सगळ्यात आमच्या मुली अडकल्या. त्यामुळे आधी त्यांना समजवलं पाहिजे आणि नंतर आंदोलन केलं पाहिजे, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.