मुंबई, 21 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर उतरून भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात आंदोलन केलं. राज्यपालांच्या या विधानाचा जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निषेध नोंदवला. शिंदे गटाकडूनही राज्यपालांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी घेतलेल्या भूमिकेचं उघड कौतुक केलं आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अवमानकारक विधानाबाबत आमदार संजयजी गायकवाड यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करुच शकत नाही,' असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
'शिवरायांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात नफा-नुकसान विसरुन ठामपणे उभा राहण्याची हिंमत दाखविण्याचे काम आमदार गायकवाड यांनी केले आहे, याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे अभिनंदन करतो.. शिवरायांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात पक्ष, गट-तट आदी विसरुन सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आमदार संजयजी गायकवाड यांनी ते धाडस दाखवले याबद्दल त्यांचे मनापासून आभार,' असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शिवरायांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात नफा-नुकसान विसरुन ठामपणे उभा राहण्याची हिंमत दाखविण्याचे काम आमदार गायकवाड यांनी केले आहे, याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे अभिनंदन करतो..
— Supriya Sule (@supriya_sule) November 21, 2022
शिवरायांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात पक्ष, गट-तट आदी विसरुन सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आमदार संजयजी गायकवाड यांनी ते धाडस दाखवले याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
— Supriya Sule (@supriya_sule) November 21, 2022
काय म्हणाले संजय गायकवाड?
या राज्यपालाला कुठंही नेऊन घाला, असे वक्तव्य शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी केलंय. तसेच भगतसिंग कोश्यारी यांना राज्याच्या राज्यपाल पदावरून काढा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यानंतर, असं वक्तव्य खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अशा प्रकारचा छत्रपतींचा अपमान होत राहिला तर आम्ही खपवून घेणार नाही, अन्यथा याचे परिणाम शिंदे-फडणवीस सरकारवर होईल, असेही ते म्हणाले आहेत.
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद उद्गार काढले. इतकंच नाही तर छत्रपती यांना कमी लेखण्याचं काम केलं. छत्रपती यांची उंची देशभर नाही तर जगभर आहे. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मूळ शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Governor bhagat singh, NCP, Supriya sule